भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत अंतरीं शोक आरंभिला

bahut antarin shok arambhila

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
बहुत अंतरीं शोक आरंभिला । कां मज विठ्ठला मोकलिलें ॥ १ ॥ त्रिविध तपानें तापलें मी बहु । जाईना कां जीऊ प्राण माझा ॥ २ ॥ तंव अकस्मात सातविया दिनीं । नामसंकीर्तनीं घोषयुक्त ॥ ३ ॥ तुकाराम रूपें येवोनी प्रत्यक्ष । म्हणे पूर्वपक्ष सांभाळींजे ॥ ४ ॥ नको करूं चिंता असें मी तुजपाशीं । घेईं अमृताशी हातींचीया ॥ ५॥ गाय केलें वत्स मुखीं निघे धार । अमृत हें सार सेवीं हेंची ॥ ६ ॥ ठेवोनियां कर मस्तकीं बोलिला । मंत्र सांगितला कर्णरंध्रीं ॥ ७ ॥ म्यांही पायांवरी ठेविलें मस्तक । दिधलें पुस्तक मंत्र गीता ॥ ८ ॥ कार्तिकांत वद्य पंचमी रविवार । स्वप्नींचा विचार गुरुकृपा ॥ ९ ॥ आनंदले मन चिद्रूपीं कोंदलें । उठोनि बैसलें चमत्कारें ॥ १० ॥ मंत्र आठविती तुकोबास्वरूपा । स्वप्नामाजीं कृपा पूर्ण केली ॥ ११ ॥ अमृत पाजिलें चवीं अनारिसीं । साक्ष ज्याची त्यासी मनामाजीं ॥ १२ ॥ बहिणी म्हणे ऐसी कृपा सद्‌गुरूची । तुकारामें साची पूर्ण केली ॥ १३ ॥