भजनी मालिका
← भजनांकडे परत

यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल ॥धु

yashode gharakade chal mala jevun ghal ||dhu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल ॥धु०॥ साध्या गव्हांची पोळी लाटीं । मला पुरण पोळी करून दे मोठी । नाहीं अडवीत गुळासाठीं । मला जेवूं घाल ॥१॥ तूप लावून भाकर करीं । वांगें भाजून भरीत करीं । वर कांद्याची कोशिंबिरी । मला जेवूं घाल ॥२॥ आईग खडे साखरेचे खडे । लवकर मला करून दे वडे । बाळ स्फुंदस्फुंदोनी रडे । मला जेवूं घाल ॥३॥ आई लहानच घे गे उंडा । लवकर भाजुन दे मांडा । लांब गेल्या गाईच्या झुंडा । मला जेवूं घाल ॥४॥ आई मी खाईन शिळा घांटा । दह्याचा करून दे मठ्ठा । नाहीं माझ्या अंगीं ताठा । मला जेवूं घाल ॥५॥ भाकर बरीच गोड झाली । भक्षुनी भूक हारपली । यशोदेनें कृपा केली । मला जेवूं घाल ॥६॥ आई मी तुझा एकुलता एक । गाई राखितों नउ लाख । गाई राखून झिजलीं नख । मला जेवूं घाल ॥७॥ नामा विनवी केशवासी । गाई राखितो वनासी । जाऊन सांगा यशोदेशी । मला जेवूं घाल ॥८॥