भजनी मालिका
← भजनांकडे परत

यम सांगे दूतां । तुह्मीं जावें मृत्युलोका । आपुलाला लोक जितुका । तितुका आणावा

yam sange dutan | tuhmin javen mrutyuloka | apulala lok jituka | tituka anava

रचनाकार: संत नामदेव · अभंग
यम सांगे दूतां । तुह्मीं जावें मृत्युलोका । आपुलाला लोक जितुका । तितुका आणावा ॥१॥ तुह्मां सांगतों कुळरंग । निंदा द्वेष करिती राग । खरी खोटी चाहडी सांगे । ते कुळ आ-पुलें ॥२॥ ज्याचें विषयावर ध्यान । परद्रव्य परस्त्री गमन । धर्मासी विन्मुखपणा । तें कुळ आपुलें ॥३॥ भावेंविण भक्ति करिती । भक्तिविणें भाव दाविती । त्यांची तुह्मीं फजिती । बहुतां प्रकारें करावी ॥४॥ मंत्रसंचारी जे लोक । देव सांडून देवताउपासक । झोटिंग वेताल खेताल देख । ते सखे बाप तुमचे ॥५॥ लटिके वासनेच्या नवसा । करिती करविती पशुहिंसा । त्यानें बहुत दिवस भरंवसा । दिला आहे ॥६॥ धातकी पातकी गुरुद्रोही । हित सांगतां गुरूसी हेडवी । विष्णुदासावेगळें करून पाहीं । सांगितले तितुके आणावे ॥७॥ नामा ह्मणे एक्या पातकीयाम दंडिताती । नाना विपत्ति काय सांगूं किती । विष्णुसासाचे वंदिती । चरणरज ते यम ॥८॥