भजनी मालिका
← भजनांकडे परत

वासनेची करणी ऐकें तूं मना । या केली रचना ब्रह्मांडाची

vasanechi karani aiken tun mana | ya keli rachana brahmandachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वासनेची करणी ऐकें तूं मना । या केली रचना ब्रह्मांडाची ॥१॥ निर्गुण चैतन्य सदा सुखरासी । त्या दिल्ही चौ-र्‍यांशीं लक्ष सोंगें ॥२॥ ऐसो हे लाघवी खेळे नाना खेळ । तेथें तूं दुर्बळ काय करिसी ॥३॥ क्षण एक चंचळ क्षण एक निश्चळ । क्षण एक विफळ सावध करी ॥४॥ क्षण एक कृपाळ क्षण एक निष्ठुर । क्षण एक उदार कृपण करी ॥५॥ क्षण एक सात्विक क्षण एक राजस । क्षण एक तामस करोनि सांडीं ॥६॥ क्षण एक प्रवृत्ति क्षण एक निवृत्ति । क्षण एक विश्रांति तप्त कर ॥७॥ क्षण एक आवडे क्षण एक नावडे । क्षण एक विघडे घडलें सुख ॥८॥ ऐसी हे लाघवी पा-हतां क्षणभंगुर । ब्रह्मादि हरिहर ठकिले जेणें ॥९॥ नामा म्हणे तरीच इचा संग तुटे । दैवयोगें भेते संतसंग ॥१०॥