भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार कृपाळ सांगशील जना । तरी कां रावणा मारियेलें

udar krupal sangashil jana | tari kan ravana mariyelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उदार कृपाळ सांगशील जना । तरी कां रावणा मारियेलें ॥१॥ नित्यानित्य पूजा सिरकमळीं करी । तेणें तुझें हरी काय केलें ॥२॥ किती बडिवार सांगसील वायां । ठावा पंढरिराया आहेसी आम्हां ॥३॥ कर्णा ऐसा वीर झूंझार उदार । त्यासी त्वां जर्जर केलें बाणीं ॥४॥ पाडिलें भूमीसी न येचि करुणा । त्याचे नारायना पाडिले दांत ॥५॥ श्रिययाळ बापुडें सात्विक निर्वाणीं । खादलें कापोनी याचें पोर ॥६॥ ऐसा कठिण कोण होईल दुसरा । कांडियेलें शिरा उखळामाजीं ॥७॥ शिवी चक्रवर्ती करिताम यज्ञयाग । कापिलें त्याचें अंग ठायीं ठायीं ॥८॥ जाचोनियां प्राण घेतला तयाचा । काय सांगसी वाचा बडिवार ॥९॥ हरिश्चंद्राचें राज्य घेऊनियां सर्व । विकले त्याचे जीव डोंबाघरीं ॥१०॥ बहुतचि श्रम दिधलें तयासि । परी तो सत्वासि ढळेचिना ॥११॥ पाडिला विघड नळादमयंतीं । ऐसी कृपामूर्ति बुद्धि तुझी ॥१२॥ आणिक तुझी कीर्ति सांगावी ती किती । केली ते फजिती माउशीची ॥१३॥ मारियेला मामा सखा पुरुषोत्तमा । नामा म्हणे सीमा फार केली ॥१४॥