भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर्थे करोनी नामा पंढरीये आला । जिवलगा भेटला विठोबासी

tirthe karoni nama pandhariye ala | jivalaga bhetala vithobasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तीर्थे करोनी नामा पंढरीये आला । जिवलगा भेटला विठोबासी ॥१॥ सद्‌गदित कंठ वोसंडला नयनीं । घातली लोळणी चरणावरी ॥२॥ शिणलों पंढरिराया पाहें कृपादृष्टी । थोर जालों हिंपुटी तुजविण ॥३॥ अज्ञानाचा भाग होता माझे मनीं । हिंडवलें म्हणोनि देशोदेशीं ॥४॥ परि पंढरीचें सुख पाहतां कोटि वाटे । स्वप्नींही परि कोठें न देखेंची ॥५॥ उदंड तीर्थाची ऐकों जाय प्रौढी । परि चित्त माझें वोढी चंद्रभागा ॥६॥ म्हणोनि चरणांची ठाकोनि साउली । आलों मज सांभाळीं मायबापा ॥७॥ तया देवाची वास न पाहती माझे नयन । न करिती पूजन कर त्यांचे ॥८॥ तेणें पंथें माझे न चलती चरण । नाइकती श्रवण कीर्ति त्यांची ॥९॥ कटी तटीं जेणें कर नाहीं ठेविले । न देखें पाउलें विटेवरी ॥१०॥ त्यांते म्हणतां देव लाजे माझे मन । ते कष्ट दारुण कवणा सांगू ॥११॥ जये गांवीं नाहीं वैष्णवांचा मेळु । न देखे सुकाळु हरिकथेचा ॥१२॥ कुंचे गरुड टके न देखों पताका । त्या देवाची शंका वाटे थोर ॥१३॥ हें जेथें न देखें तेथें खंती वाटे जीवीं । नामा म्हणे आवडता प्राण माझा ॥१५॥