भजनी मालिका
← भजनांकडे परत

तव अंतरिक्षीं गगनीं । देव बैसोनि विमानीं

tav antarikshin gaganin | dev baisoni vimanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तव अंतरिक्षीं गगनीं । देव बैसोनि विमानीं । वर्षताती दिव्य सुमनीं । पांडुरंगावरी ॥१॥ विठोबा गुणनिधी । सवें पुंडलिक सुबुद्धि । लघिमा आणिमादी सिद्धी । सवें असती ॥२॥ मग नेमिलिया तिथी । कृष्णपक्ष अष्टमी समर्थीं । नाम संकीर्तन संतसंगतीं । तो ब्रह्मप्राप्ति पावला ॥३॥ नवमीं गजर कथेचा । तरि वैष्णव तोचि साचा । चतुर्भुज होईल हे वाचा । वदोनियां गेले ॥४॥ सहज ते दशमी । दिंडी जागरण आश्रमीं । तो येईल वैकुंठ ग्रामीं । कीर्तन करीतची ॥५॥ एकादशी श्रेष्ठ गाढी । नामस्मरणें कोटीयाग जोडी । येकी घडी युगाएवढी । एवढें सामर्थ्य इयेचें ॥६॥ एकादशी दिननिशीं । जागरणीं ह्रषिकेशी । कीर्तन करी अहर्निशीं । तरि तो तारिल सर्व जनां ॥७॥ द्वादशीस क्षीराब्दी । कीर्तन करील आल्हादीं । तो पावन होईल गोविंदीं । निजपदीं विष्णूचा ॥८॥ त्रयोदशीं उत्तम थोर । करिल दिंडी पताका गजर । टाळ मृदुंगे झणत्कार । तरि तो सकळ कुळ तारील ॥९॥ नामा म्हणे चतुर्दशीं । अमावस्येचा दिवशीं । ज्ञानदेवीं राहेल नेमेंसी । तरी तो तरैल भूतकाळीं ॥१०॥