भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव तेथें नवल वर्तलें । आकाश असे विमानीं दाटलें

tanv tethen naval vartalen | akash ase vimanin datalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव तेथें नवल वर्तलें । आकाश असे विमानीं दाटलें । म्हणती मूळपीठ वैकुंठ देखिलें । पुंडलिकासगट ॥१॥ पंढरीहुनि आलें कैसें । पुंडलिक देव सरिसे । ज्ञानदेवासवें नामा असे । आणि विष्णुभक्त अपार ॥२॥ राही रुखमाई सत्यभामा । गाई गोपाळ मेघःश्यामा । म्हणती पाहाहो महिमा । या विष्णुभक्तांचा ॥३॥ सवें ध्रुव प्रल्हाद अंबऋषी । रुक्मांगद सूर्यवंशी । आणि ऋषीमुनी तापसी । ऐसिया समवेत वनमाळी ॥४॥ बळी भीष्म नारद । उद्धव अक्रुर विद्‌गद । आणि बिभीषण सुबुद्ध । हनुमंतादि करुनि ॥५॥ हा हा हु हु गंधर गाती । रुणुझुणु रुणुरुणु विणे वाजती । देवांगना आरतिया ओवाळिती । देशभक्तासहित ॥६॥ ऐसा शुभ काळ समयो । जाला भाग्याचा उदयो । ज्ञानदेव नामदेव पाहाहो । धन्य धन्य धरातळीं ॥७॥ ज्ञानदेवो निजमानसीं । विष्णुमूर्तीसी लीन जाला ॥८॥