भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव निजभुवनीं सुखें पंढरीनाथ । नित्य जीवीं आर्त निजहक्तांचे

tanv nijabhuvanin sukhen pandharinath | nitya jivin arta nijahaktanche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव निजभुवनीं सुखें पंढरीनाथ । नित्य जीवीं आर्त निजहक्तांचे ॥१॥ कृपेचा वारेसु होता देवापोटीं । तेचि करी गोष्ट रुक्माईसी ॥२॥ क्षेम माझा नामा यावा एक वेळां । मग मी जीवावेगळा जाऊं नेदी ॥३॥ आजि माझा डावा कां लवतो लोचन । करितसे स्फुरण वामबाहू ॥४॥ उद्वेग उपसर्ग वाटती जीवाशीं । कवना जिवलगाशीं कष्ट होती ॥५॥ वाजतां पैं वारा न लागावा राजसा । माझ्या विष्णुदासा भाविकासी ॥६॥ वाटे तानभूक जाली त्या पीडणी । तरीच माझ्या मनीं ऐशी दशा ॥७॥ तंव ती विश्वमाता विचारी नावेक । अवचिता शोक पडिला कानीं ॥८॥ म्हणे तृषाक्रांत नामा करितसे धांवा । वेगीं जाऊनि देवा सांभाळावें ॥९॥ तंव तो आर्तबंधु ऐकोनि वचन । मनाचेनि मनें वेगू केला ॥१०॥ तंव गडगडित कूप उदकें वोसंडला । कल्पांतीं खवळला सिंधु जैसा ॥११॥ ज्ञानदेव म्हणे जालें अभिन्नव । कैसा ऋणिया देव केला येणें ॥१२॥ सावध करोनिया दिलें आलिंगन । जीवें निंबलोण उतरिलें ॥१३॥ तो येरें चरणावरी ठेवियेला माथा । म्हणे माझे आहे चिंता विठोबासी ॥१४॥ नामा म्हणे माझे बहु लळे पुरविले । कैं देखेन पाउलें विटेवरी ॥१५॥