भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव म्हणती नारदमुनि परियेसी वो माते । सांगेन मी तूतें सत्य मानी

tanv mhanati naradamuni pariyesi vo mate | sangen mi tuten satya mani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव म्हणती नारदमुनि परियेसी वो माते । सांगेन मी तूतें सत्य मानी ॥१॥ हा निर्विकल्प देव येतसे रुपा । करावया कृपा भक्तजनां ॥२॥ हा शरणांगता वत्सलु अनाथा कृपाळु । मिरवी दीनदयाळु ब्रीद जगीं ॥३॥ म्हणोनि जन्मकर्मे असंख्यात जगीं । केलीं याचलागीं नारायणें ॥५॥ अंबऋषीचें येणें सोसले गर्भवास । राखितो उदास बळिचें द्वार ॥६॥ विकिला पाइकु कायामनें वाचा । जाला पांडवांचा मोलेंविण ॥७॥ गोकुळीं नंदाचीं राखिलीं गोधनें । प्रीति उच्छिष्ट खाणें गौळियांचें ॥८॥ विघ्न पडे तेथें आपणां वोडवी । संकटीं सोडवी माझीं म्हणोनी ॥९॥ सांडोनि अभिमान न्यून कामें करी । जालासे अधिकारी दास त्याचा ॥१०॥ आज्ञा वाहे शिरीं जीवीं जतन करी । मानिलीं सोयरी जिवलगें ॥११॥ एके अपमानिती दावेवरी बांधिती । उपहास करिती हर्ष मानी ॥१२॥ केले अपराध नेघे अपुले चित्तीं । दुणावितो प्रीति नित्य नवी ॥१३॥ ऐसे ब्रह्मांडनायकु देवा मुगुटमणी । हे त्याची करणी ख्याती जगीं ॥१४॥ आम्ही सकळ भक्त याचे पूर्ण अंशु । चरणींचा सौरसु नामयासी ॥१५॥