भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोपान म्हणे देवोत्तमा । पूर्वीं येथें होता ब्रह्मा

sopan mhane devottama | purvin yethen hota brahma

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोपान म्हणे देवोत्तमा । पूर्वीं येथें होता ब्रह्मा । आणि तुम्हीं सर्वोत्तमा । कोणे स्थळीं होतां देवा ॥१॥ देव म्हणे कथा परिस । कोटयानुकोटी युगांस । आम्हीं होतों पंढरीस । अनंत कल्पें गेलीं ॥२॥ अनंत भक्तांचिया मेळीं । अनंत वैष्णवें भूमंडळीं । माजीं गवसले सकळीं । केली आगळी पुंडलिकें ॥३॥ येणें प्रसन्न केलें शंकरा । शंकरें मज दाखविलें निर्धारा । आपण राहोनि पाठमोरा । विश्व तारिलें कीर्तनें ॥४॥ भक्ताचेनि आराधनें । साधियेलें बहुत पुण्यें । माझें जालेंसे येणें । एक कारण पुंडलिकाचें ॥५॥ पूर्वापार पंढरीसी । होती विष्णुमात ऐशी । निर्धार करोनि मानसीं । अहर्निश अनुष्ठान ॥६॥ येथोनि पूर्वभाग पंढरी । पश्चिमभागीं ब्रह्मा अवधारी । अवतार कर्‍हे पाठारीं । महादेव शिखरीं मानदेसी ॥७॥ तेहतीस कोटी देवस्थळी । पूर्वा पश्चिम वैश्य मंडळी । उग्र तप साधिलें चंद्रमौळी । या इंद्रनीळ पर्वतावरी ॥८॥ द्रोणाचळ इंद्राचळ । हनुमंतें आणिला विशाळ । त्याच्या शाखा अधोमूळ । तो हा इंद्रनीळ पर्वत ॥९॥ येथें वल्ली सुवर्णाकार । गुप्त असती त्या निर्धार । दिसे अस्तमानीं अंधार । दीप आकार जगाप्रती ॥१०॥ येवोनियां दक्षिणद्वार । गोकर्ण महाबळेश्वर । पाताळद्वारीं पूजा शंकर । बेलपत्र अद्यापि निघती ॥११॥ नामा म्हणे देवाधिदेव । सांगितला स्वानुभाव । अधिष्ठान गुढाव । सोपानदेव निवांत ॥१२॥