भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीविठ्ठलें आपुल्या मुखवचनें । नामदेवासी करी अज्ञापन

shriviththalen apulya mukhavachanen | namadevasi kari adnyapan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
श्रीविठ्ठलें आपुल्या मुखवचनें । नामदेवासी करी अज्ञापन । होवोनि दीनाचें अति दीन । सद्‌गुरूसी शरन रिघावें ॥१॥ जोडल्या सद्‌गुरुकृपालेश । मग सर्वत्र माझाचि प्रकाश । तुज मज भेदाचा भासज । तो निरसोन जाईल ॥२॥ नामा म्हणे तुजसी । पावावया सेविजे सद्‌गुरूसी । तो तूं रोकडा जोडिलासी । आतां सद्‌गुरुसी काय काम ॥३॥ फळ तरूवर शिखरींज । म्हणोनि आरोहण कीजे त्यावरी । तें फळ अवचिता जोडिलें करीं । मग तयावरी कासया चढावें ॥४॥ मगा श्रीहरी म्हणे अज्ञान । सांडून सेविजे गुरुचरण । तुझ्या प्रेमें माया सोंग धरून । लटिका तुजपाशीं मी खेळें ॥५॥ जंव सद्‌‍गुरूचें नाहीं सेवन । तंव मी जैसें स्वप्नीचें धन । माझें न तुटे भवबंधन । सद्‌‍गुरुआज्ञेवांचूनी ॥६॥ तेणें नामा सद्‌गदित जाला । विठोबाच्या चरणीं लागला । कोण गुरु पाहिजे केला । तें सांगिजे स्वामिया ॥७॥ मग श्रीविठ्ठल म्हणे ऐक आतां । सांगेन सद्‌गुरुची वार्ता । त्वां पाहोनि तत्त्वतां । शरण तात्काळ रिघावें ॥८॥ भक्तीचें नेणें लक्षण । कृपामंद दयाहीन । इतरांचे अवगुण । अखंड मुखीं जल्पती ॥९॥ मी एक जाणता सर्वांठायीं । सर्व शिकविलें म्यांचि पाही । ऐसें बोलती जनप्रवाही । महंतीलागीं ॥१०॥ देखिलिया सज्जन । त्यासी करी सन्मान । सभा देखोनियां छळण । करी करवी तयाचें ॥११॥ लांडें लटिकें गद्य पद्य । पुसोनी होती श्लघ्य । नेणें तरी हांसोनि निंद्य । बोलती ह्मा गुरूसी ॥१२॥ तो जरी सांगे खरें । त्यासी बोलती बरें बरें । सभाजनांसी नेत्रद्वारें । अशुद्धता दाविती ॥१३॥ आपण न सांगती आपुलें गुज । पुढल्यासी म्हणती नकळे तुज । ऐसें संदेह करणीचें मोज । वाटे तया ॥१४॥ शिष्य करितां उल्हासती । शिष्य होई म्हणोनि उपदेशिती । नानापरी बोधिती । सेवेलागीं ॥१५॥ शिष्य करिती बहुवसा । त्यांच्या सेवेची करिती आस । जो न भजे त्यास । शिव्याशाप देताती ॥१६॥ तंत्र मंत्र उपदेशिती । ध्यान आसनीं गोविती । देवा ब्राह्मणा न भजती । आचारभ्रष्ट जे ॥१७॥ धातु विद्येची धरिती गोडी । जारणमारणाची अति आवडी । विषयवासनेची हुंडी । अखंड जीवीं ॥१८॥ ज्ञान गर्वाचा महिमा बरवा । श्रीगुरु ऐशा अखंड भावा । शिष्यसमुदाय देखोनि गर्वा । थोरीवेचा मानिती ॥१९॥ असो बहु ऐसें कथान । परी सद्‌‍गुरु कृपाधन । त्याचें ऐक महिमान । सावध चित्तें ॥२०॥ ज्यासी गुरूत्वाचे नाहीं काज । शिष्य भजतां वाटे लाज । उदास वृत्ति सहज । निर्मळ भोळा ॥२१॥ निंदा स्तुति समान । बोलती भेदिती कठिण वचन । कधीं न होती क्रोधायमान । कवणाहीवरी ॥२२॥ जे नेणती खरें खोटें । समान वाटे सान मोठें । सुखदुःखाचे चपेटे । न शिवती कदाकाळीं ॥२३॥ शिष्य करितां आळस चित्तीं । केलिया सर्वस्व निरोपिती । कांहीं थोरीव नाहींच चितीं । महत्त्वाची ॥२४॥ सज्जन देखोनी आनंदती । त्याचे गुणागुण न विचारिती । जीवें भावें इच्छिती । साधुसंग ॥२५॥ आपुला कष्टवुनी देहो । ज्ञान कर्काचा कलहो । साधुसेवेचा मनीं लाहो । करी सदा ॥२६॥ जे आंत बाहेरी भरोनी उरले । अंतरीं निवोन विरालें । परब्रह्मीं सहजाविले । नेणोंज काय ॥२७॥ ऐसें साधुचें महिमान । साधतां कैचें उरेल मन । कल्पा अवधीं करितां कथन । नव्हे पूर्ण पूर्णता ॥२८॥ ऐसा साधु भेटेल तुज । तरी मीच होवोनि पावसी मजा । जाईल सर्व संदेह आज । आपेंआप नाम्या ॥२९॥ मग नामदेव म्हणे देवा । ऐसा साधु भेटेल जेव्हां । तरी कैशापरी सेवावा । कृपानिधी तो ॥३०॥ मगा बोलिले श्रीरंग । दैवत बुद्धीचा होईल त्याग । तना मन अर्पोन चांग । शुद्ध सेवा करावी ॥३१॥ तर्क वितर्क बाह्ममुद्रा । तेथें न चले गा भक्तनरेंद्रा । तारीं तारीं या भवसमुद्रां । म्हणोनि शरण रिघावें ॥३२॥ ते अंतर्बाह्य व्यापक । जाणतां सर्व लीला कवतुक । जैसे त्यासी देखती देख । तैसे तयासी आज्ञापिती ॥३३॥ भाग्यें जरी जोडती त्याचे चरण । तरी वर्तणूक आहे कठीण । तें तुज सांगतों गुप्त खूण । सावधान ऐक पां ॥३४॥ शरीर वेंचिलें तरी वेंचिजे । परी सद्‌‍गुरुवचन नुल्लंघिजे । रात्रंदिवस राहिजे । आज्ञा संकेतीं ॥३५॥ ज्यावरी गुरुची प्रीति । त्याची अनन्य भावें कीजें भक्ती । आज्ञेवांचोनि कल्पांतीं । विरोध कोणासी न करावा ॥३६॥ कां जरी तो सर्वांतरीं आहे । विरोध कोणाचा न साहे । विशेष सद्‌‍गुरु जरी होये । तरी खेद न कीजे ॥३७॥ अरे विरोधभाव असतां । तें चढे सद्‌‍गुरुच्या माथा । जैसा घटभंग होतां । अमृत सांडे ॥३८॥ ज्याशीं सद्‌गुरूची कृपा असे । त्यासि मानावें आम्ही ऐसें । सर्वस्व जातां मानसें । न करिजे अंतर ॥३९॥ देखे त्याचे ह्रदयांतरीं । सद्‌गुरु वसे निरंतरीं । त्यासि खेद होतां भारी । अंतरे सद्‌‍गुरु ॥४०॥ क्रोध ह्रदयीं भरला । तो आत्मस्थितीसी अंतरलाअ । तोच गुरूचाअ घात केला । शिष्याहातीं ॥४१॥ गुरुशिष्य तोचि निजबंधु । त्यासि स्वप्नीं न कीजे विरोधु । करितां घडे गुरुवधु । शास्त्रवाक्य ॥४२॥ तरी गा कार्याकारणें । बोलिजे तेंची घडावें वर्तणें । एक होतां कोपायमानें । एक समाधान त्यास द्यावें ॥४३॥ जो आपुल्या गुरूची स्तुती करी । त्याचे चरणा वंदावे शिरीं । निंदा बोलतीये अवसरीं । निघिजे तेथोनी ॥४४॥ गुरूसमीप न बैसिजे । गुरूसी वचना न बोलिजे । आज्ञा मागोनी वंदिजे । कार्याकाराणें ॥४५॥ देशीं आहे सद्‌‍गुरु । तिकडे कीजे नमस्कारू । चंद्रकारणें चकोरू । तैसा भेटी इच्छिजे ॥४६॥ गुरूसी अर्पिजे तन मन । गुरूसी अर्पिजे वित्त धन । गुरूसी अर्पिजे चैतन्य । आनंदरूप ॥४७॥ गुरुचे दोष गुण । मनें न कीजे उच्चारण । जें जें गुरूचें आज्ञापन । मेरू ऐसें मानिजे ॥४८॥ सज्जनाची संगती धरिजे । गुरूरूप विश्व मानिजे । चित्तानुसार अर्पिजे । साधुजनांसी ॥४९॥ ज्यासि सद्‌‍गुरु कोपला । तो साधु असतां खर वागाला । ईश्वर जरी साह्म जाला । तरी काढों न शके ॥५०॥ सद्‌‍गुरु आधीन सकळ देव । गुरु आधीन पितर मानव । सद्‌‍गुरु पूजितां सर्व । आनंदातें पावती ॥५१॥ ऐसें सद्‌गुरुचें महिमान । म्हणोनि ब्रह्म त्या आधीन । तो जरी पतितासी देईल मान । तरी ब्रह्मपूर्ण तो होय ॥५२॥ ऐसें जेणें आचारावें । तरी सद्‌‍गुरूसी शरण जावें । नाहीं तरी करावें । नामस्मरण माझें पैं ॥५३॥ तेणेंकरून कांहीं एक । निवारूं शकेल जन्मदुःख । कोणें एक जन्मीं सद्‌गुरु देख । भक्ति करोनि पाविजे ॥५४॥ चढाओढी ग्रुरु करिती । मग सुबुद्धिहि टाकिती । त्यासी यमाघरीं प्राप्ति । खरत्वाची ॥५५॥ सद्‌‍गुरुसेवा तें मोक्षपद । सद्‌गुरुसेवा तें आनंदपद । सद्‌‍गुरुसेवा तो ब्रह्मावबोध । कैवल्यप्राप्ती ॥५६॥ असो ऐसिया परी । जो सद्‌‍गुरु वाक्य वाहे शिरीं । तोचि ब्रह्मविद्येचा अधिकारी । हरिहरां वंद्य तो ॥५७॥ ऐसें नामदेवाप्रति श्रीहरी । स्नेह साक्षेपें निरूपण करी । ऐकोनियां चराणावरी । सद्‌‍गदित होउनि लोटला ॥५८॥ देवा तूं होवोनि माझी दिवटी । गुरुनिधान दाखवी दृष्टी । जेणें करूनी भवबंध गांठी । सुटेल सर्वथा ॥५९॥ मग कळवळोनी श्रीहरी । नामदेवातें पोटासी धरी । जाय पावशील झडकरी । हस्त विसा खेचराचा ॥६०॥ तेणे नाम्यासी समाधान । देवही जाला सुखासंपन्न । नामा पावोनी ब्रह्मज्ञान । मिळशील माझ्य़ा स्वरूपीं ॥६१॥ ऐसें हें देवभक्त निरूपण । प्रथम शिष्यासी करवी श्रवण । मग दीजे पूर्णपण । म्हणे नामा ॥६२॥