भजनी मालिका
← भजनांकडे परत

सवें तीर्थें मिळालीं अनंतें । तीं सुखी करुनी कृतार्थें

saven tirthen milalin ananten | tin sukhi karuni krutarthen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सवें तीर्थें मिळालीं अनंतें । तीं सुखी करुनी कृतार्थें । संवत्सरा जावोनी सोपानातें । समाधीसी बैसंवू ॥१॥ अनंत सुखाचिया रासी । उदैल्या भक्तांचिया मानसीं । आनंद जाला पुंडरिकासी । मग न बोले कांहीं ॥२॥ सोपान म्हणे वैकुंठा । बिजें किजो महाश्रेष्ठा । संवत्सर ग्राम कर्‍हे तटां । वैकुंठासहित चालावें ॥३॥ इंद्रचंद्रब्रह्माहर देव । आणि गण मिळाले सर्व । तेहतीस कोडी देव । विमानीं आरुढले देखा ॥४॥ निवृत्ति सोपान ज्ञानदेवो । त्रिमूर्ति तिन्ही देवो । धर्मरक्षणार्थ पाहा हो । मनुष्यरुपें अवतरले ॥५॥ तिघेही उभे सन्मुख । तिघांही थोर संतोष । विनविती केशवास । स्वामी विनंति अवधारिजो ॥६॥ ये आळंकापुरीसी ।स्थापावें कोटी तीर्थांसी । जो जो भक्त येईल स्नानासी । तो वैकुंठासि आणावा ॥७॥ ऐसें आइकोनि श्रीहरी । म्हणे धन्य धन्य तुमची वैखरी । जगदोद्वार केला संसारीं । बावीस वरुषें असतां पैं ॥८॥ जो जो दिवस उगवला । तो तो ज्ञानदेवें सफळ केला । पद पदांतर कथिला । जेणें आत्माराम संतोषे ॥९॥ पूर्वीं अनंत भक्त जाले । पुढें ही भविष्य बोलिलें । परी निवृत्तीं ज्ञानदेवेम सोडविले । अपार जीवजंतु ॥१०॥ जो अभक्त मनुष्य जनीं प्राणी । ज्याचा भार न साहे मेदिनी । मग इहीं अवतार घेउनी । जग तारिलें कीर्तनें ॥११॥ नामा पंढरीस नाचत । ज्ञानेश्वर आळंकापुरीं शोभत । सोपान संवत्सरी मिरवित । निवृत्ति त्र्यंबकसिखरीम ॥१२॥