भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्त्वाचा सागर राजा हरिश्चंद्र । स्वप्नीं हें समग्र दिलें राज्य

sattvacha sagar raja harishchandra | svapnin hen samagra dilen rajya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सत्त्वाचा सागर राजा हरिश्चंद्र । स्वप्नीं हें समग्र दिलें राज्य ॥१॥ ब्राह्मणासी सुवर्ण औटभार । संकल्प हा त्वरें सोडियेला ॥२॥ जागृतीमाजी येऊनि ब्राह्मण । मागती सुवर्ण राजयासी ॥३॥ वंदूनि चरण राजा बोले त्यासी । चला आश्रमासि स्वामि आतां ॥४॥ समारंभें रूपें घेऊनि ब्राह्मण । अयोध्येकारणें आले तेव्हां ॥५॥ राजद्वारापाशीं येऊनि ब्राह्मण । मागत सुवर्ण राजयासी ॥६॥ भांडारियासी आज्ञा करी हरिश्चंद्र । आणा वेगीं त्वरें सुवर्ण हें ॥७॥ ऐकूनियां शब्द क्रोधें तो ब्राह्मण । करीत ताडण राजियासी ॥८॥ माझें मज देसी काय समजोनि । विचार हा मनीं कैसा केला ॥९॥ वंदूनि चरण बोले हरिश्चंद्र । कृपेचे सागर स्वामी तुम्ही ॥१०॥ कृपा करुनियां केले हें सावध । करा अपराध क्षमा माझे ॥११॥ तारामती त्यासी करी विनवणी । धरूनियां वेणी मारी तिसी ॥१२॥ रोहिदास बोले वंदूनि चरण । ऐकीं विज्ञापना एक माझी ॥१३॥ स्वामीपाशीं मी तों रहातों गहाण । देऊनि सुवर्ण जाऊं आम्ही ॥१४॥ राजा बोले स्वामी द्यावी जी अवधि । तुम्ही कृपानिधि महाराजा ॥१५॥ नवखंडा वेगळी असे वाराणसी । विकूनि देहासी देऊं आम्ही ॥१६॥ बोलावूनि मंत्री सांगे हरिश्चंद्र । करा कारभार स्वामीपाशीं ॥१७॥ स्वामी सांगतील तेंच करा मान्य । कार्य विचारूनि करीत जावें ॥१८॥ आह्मी जातों आलां कृपा असों द्यावी । सकळां सांगावी विनंति माझी ॥१९॥ ठेवूनियां सर्व अलंकार भूषण । झालीं तिघेजण मार्गस्थही ॥२०॥ राजा हरिश्चंद्र मागें तारामती । चिमणीही मूर्ति रोहिदास ॥२१॥ पाहूनियां लोक करिताती शोक । पशुपक्षादिक सर्व तेही ॥२२॥ कृपेच्या सागरा राजा हरिश्चंद्रा । कां आम्हां सर्वत्रां मोकलीसी ॥२३॥ लेंकुराचेपरी केलासे सांभाळ । मातेविण बाळ राहे कैसें ॥२४॥ लागेल तें द्रव्य घेईं आह्मापाशीं । देईं या विप्रासी महाराजा ॥२५॥ येती काकुळती करिती नमस्कार । नको तूं अंतर देऊं आम्हां ॥२६॥ विप्रासी लोक येती काकुळती । देईं हा नृपति आम्हापासीं ॥२७॥ द्विगुणी सुवर्ण देतों तुज आतां । सोडीं कृपावंता हरिश्चंद्रा ॥२८॥ स्वामी तुम्ही करा राज्यकारभार । ठेवा हरिश्चंद्र आम्हापाशीं ॥२९॥ नका करूं गाईवत्सा ताडातोडी । येती घडोघडी काकुळती ॥३०॥ ऐकोनियां बोले क्रोधें तो ब्राम्हण । जा राजा त्वरेनें येथूनियां ॥३१॥ राजियानें केली सर्वां विनवणी । निघाला तेथूनि हरिश्चंद्र ॥३२॥ आदित्यासी तेव्हां सांगे विश्वामित्र । तपा तुम्ही तीव्र सोळा कळा ॥३३॥ वरूणासी सांगे आटवावें पाणी । जळशोष मेदिनी पाडियेला ॥३४॥ वायुलागीं सांगे नका येऊं येथें । जात तया पंथें हरिश्चंद्र ॥३५॥ वृक्ष हे जळाले पाषाण उलले । त्या पंथें चालिलीं तिघेजण ॥३६॥ शरीरें तिघांचीं करपोनियां गेलीं । तृषा ते लागली रोहिदासा ॥३७॥ रोहिदास बोले माते दे जीवन । कासावीस प्राण होतो माझा ॥३८॥ तशामध्यें वृद्ध ब्राम्हण होऊनि । आला तया वनीं विश्वामित्र ॥३९॥ येऊमि राजास आशिर्वाद केला । सत्त्वधीर मला राजया तूं ॥४०॥ आम्हीं तिघेजण पुत्न आणि दारा । जात हरिश्चंदा भिक्षेलागीं ॥४१॥ उष्णकाळदीन पायां आले फोड । देई चर्मजोडे तिघांजणा ॥४२॥ ऐकतांचि ऐसें केलें त्या अर्पण । झालीं तिघेजण मार्गस्थही ॥४३॥ पांया आले फोड वाहती रुधिर । राजा हरिश्चंद्र चालतांना ॥४४॥ रोहिदास बोले ताता पाजीं पाणी । बोलतां वदनीं शब्द नये ॥४५॥ कडे घेऊनियां रोहिदास बाळ । धुंडितसे जळ वनामाजी ॥४६॥ विश्वामित्रें वनीं लाविला वणवा । चुकली हे तेव्हां तारामती ॥४७॥ घाबरी ते झाली पाहे वेडयावाणी । न दिसे नयनीं हरिश्चंद्र ॥४८॥ कृपेच्या सागरा राजा हरिश्चंद्रा । कां मज उदारा मोकलीलें ॥४९॥ रोहिदास बाळ घेऊनि सांगातें । गेलां कोण्या पंथें महाराजा ॥५०॥ तृषाक्रांत झालें होतें माझें ताम्हें । पाजिलें जिवन कोठें त्यासी ॥५१॥ तारामती शोक करी त्या वनांत । आले अकस्मात्‌ । विश्वामित्र ॥५२॥ कोणीची तूं कांता फिरसी या वनीं । बोले त्यालागुनी तारामती ॥५३॥ भ्रतार हरिश्चंद्र रोहिदास बाळ । चुकले भूपाळ बनामाजी ॥५४॥ येरु बोले दोघे नेले आहाळोनी । प्रेतें तिसी दोन्ही दाखविलीं ॥५५॥ पाहूनियां प्रेते पिटीलें वदन । आक्रोशें रुदन करी तेव्ही ॥५६॥ कां हो स्वामी मज सांडियेलें येथें । धरीयला पंथ वैकुंठींचा ॥५७॥ रोहिदास बाळ सांगातें घेउनी । मजला कां वगीं सांडियेलें ॥५८॥ सकुमार शरीर पंथीं झाले क्लेश । ह्मणोनी उदास झालां तुम्ही ॥५९॥ तशामध्यें तुम्हां साह्य झजला अग्नि । माझें काम स्मरण विसरलां ॥६०॥ सवें असे बाळ हळू चाला पंथ । येतें मी धांवत मागें आतां ॥६१॥ रोहिदास बाळ घेतला ओसंगा । कांहो पांडुरंगा ऐसें केलें ॥६२॥ कांहो चुकविलें माझिया पाडसा । पाहूं राजहंसा कोठें आतां ॥६३॥ तृषाक्रांत झालें होतें माझें तान्हें । मिळालें जीवन नाहीं त्यासी ॥६४॥ पतिपुत्र दोघे गेले निजधामा । भेट मेघ:शामा करीं माझी ॥६५॥ वनीं ऐसा शोक करी तारामती । गेला तो गभस्ती अस्तमाना ॥६६॥ विश्वामित्न म्हणे ऐक आतां बाई । होणार तें कांहीं न चुकेची ॥६७॥ देईं यांसी अग्नी झालीसे यामिनी । भय या काननीं श्वापदाचें ॥६८॥ बोले तारामती ऐका तुम्ही ताता । पतिसवें आतां अग्नि द्यावा ॥६९॥ येरु म्हणे तुझा पति आहे ऋणी । ऐकिलें श्रवणीं आम्हीं ऐसें ॥७०॥ पतीचें जें ऋण फेडी प्रतिव्रता । गोष्ट हे अनंता मानता हे ॥७१॥ बोले तारामती ऋणी तिघेजण । मागुती हें येणें जन्मालागीं ॥७२॥ ताता तुम्ही आतां अग्नि द्यावा त्वरें । करुनी अव्हेर गेला तेव्हां ॥७३॥ दोन प्रहर रात्र झालीसे यामिनी । व्याघ्र हा होउनी आला तेथें ॥७४॥ ओढी रोहिदासा करुनी गर्जना । आली ते मूर्च्छना सतीलागी ॥७५॥ गेली ती यामिनी अरुणोदय झाला । अकस्मात्‌ आला हरिश्चंद्र ॥७६॥ सवें असे त्याच्या रोहिदास बाळ । भेटला वेल्हाळ मातेलागीं ॥७७॥ तिघांसही तेव्हां झालें समाधान । वसिष्ठ चरण आठविती ॥७८॥ एकामागें एक चालताती पंथ । देखियलें तेथें अन्नछत्न ॥७९॥ रम्य स्थळ जागा अपूर्व ते फार । सुंगध तरुवर डोलताती ॥८०॥ विश्वामित्नें तेथें केलेंसे निर्माण । होताती भोजन ब्राह्मणाचें ॥८१॥ त्याची पंथें जाण राजा हरिश्चंद्र । येऊनियां विप्र बोले त्यासी ॥८२॥ चला महाराजा माझ्या आश्रमासी । करी भोजनासी आवडीनें ॥८३॥ राजा म्हणे नव्हे आमुचा हा धर्म । नका करुं श्रम तुम्ही आतां ॥८४॥ वंदुनी चरण पुढें चाले पंथ । आली अकस्मात्‌ तारामती ॥८५॥ विश्वामित्रें तेथें केलेंसे विचित्र । मायेचा हरिश्चंद्र निर्मियेला ॥८६॥ आणिक प्रकारें विलास भोगीत । असे हर्षयुक्त आनंदानें ॥८७॥ येऊनियां विप्र बोले सतीलागीं । चला बाई वेगीं आश्रमासी ॥८८॥ अन्नोदक सेवीं रुचेल हें तूतें । असे तुझा कांत तेथें बाई ॥८९॥ बोलावितो तुज पाहे विलोकुनी । देखे त्या नयनीं तारामती ॥९०॥ स्मरूनियां तेव्हां वसिष्ठ चरणा । कां गा नारायणा ऐसें केलें ॥९१॥ पूर्वेचा हा सूर्य पश्चिमे उगवेल । समुद्र सांडील मर्यादेसी ॥९२॥ ऐसेंही घडेल कळे कोणकाळें । परी सत्वासी न ढळे हरिश्चंद्र ॥९३॥ दीपक हा कैसा अंधारीं पडला । वायुसुत भ्याला भुतालागीं ॥९४॥ ऐसें सांगा कोठें झालें विपरीत । तैसा नव्हे सुत शिबीचा हा ॥९५॥ तैसा हरिश्चंद्र नोहे हा निश्चित । चाले पुढें पंथ तारामती ॥९६॥ ताता तुम्ही आतां नका करूं श्रम । नोहे ऐसा धर्म आमुचा हा ॥९७॥ रोहिदास बाळ आला तयेवेळीं । ऋषि त्या जवळी पातलासे ॥९८॥ हातीं घेऊनियां उदकाची झारी । प्राशन तूं करीं बाळा आतां ॥९९॥ तुझी मातापिता असे अन्नछत्रीं । बोलाविती नेत्नीं पाहें आतां ॥१००॥ पाहूनियां त्यानें विस्मय तो केला । अगस्ती ग्रासिला समुद्रानें ॥१०१॥ ऐसें कोठें नाहीं झालें विपरीत । दोघेंहिनिश्चित नोहेती हे ॥१०२॥ आमुचा हा धर्म नोहे ऐसा स्वामी । कृपा आतां तुम्ही असों द्यावी ॥१०३॥ विस्मय तो ऋषि करितो मनांत । नाहीं सिद्धि जात पण माझा ॥१०४॥ मार्ग हा क्रमितां तिघां भेट झाली । वार्ता सांगितली एकमेकां ॥१०५॥ हरिश्चंद्र बोले नेणें मी हें कांहीं । लक्ष असे पायीं वसिष्ठाच्या ॥१०६॥ पुढें देखियलें वोस तें नगर । असे भयंकर पिशाच्य तें ॥१०७॥ तेथें स्मरूनियां वसिष्ठ चरण । ध्यानीं नारायण आठविती ॥१०८॥ पुढें देखियली नगर वाराणसी । वंद्य सर्वासी ते देवादिकां ॥१०९॥ भूमीवरी शिवें आणिलें कैलास । करिताती वास पूण्यप्राणी ॥११०॥ काळबहिरवाची तेथें कोतवाली । भय नाहीं बोली यमाची ते ॥१११॥ पवित्र हें वाहे भागिरथीचें जल । हरती सकळ दोष सर्व ॥११२॥ देखोनि हरिश्चंद्रें केला नमस्कार । पोहोंचलें तें तीर भागिरथीचें ॥११३॥ तिघांजणीं तेव्हां केलें तेथें स्नान । आला तो ब्राम्हाण तेचि वेळां ॥११४॥ धुंडितांना तुम्हां मोठा झाला श्रम । कासयासी धर्म केला ऐसा ॥११५॥ हरिश्चंद्रें केलें त्यासी दंडवत । असावें सांगात स्वामी आतां ॥११६॥ तिघांजणीं माथां बांधोनियां तृण । बैसलीं जाऊन हाटवलीं ॥११७॥ पाहती सकळ नगरीचे लोक । अयोध्येचा नृप हरिश्चंद्र ॥११८॥ सकुमार त्याची कांता तारामती । सगुणही मूर्ति रोहिदास ॥११९॥ ब्राम्हीणासी यानें राज्य दिलें दान । राहिलें सुवर्ण याचें याचें कांहीं ॥१२०॥ म्हणोनियां उभीं केलीं ही बाजारी । प्रारब्धाची दोरी पाहें कैसी ॥१२१॥ विकावया आणिली लावण्य वनिता । समजली वार्ता वेश्येलागीं ॥१२२॥ येऊनि ब्राम्हाणा पुसे तिचें मोल । सुवर्ण एक तुळ घेऊं इचें ॥१२३॥ मानली हे गोष्टी वेश्येचिया चित्ता । घेतली हे आतां तारामती ॥१२४॥ चाल बाई आतां माझिये सदनीं । होशील स्वामिनी सर्वस्वीं तूं ॥१२५॥ आवडे तितुके लेईं अलंकार । विलास समग्र भोगीं आतां ॥१२६॥ देखूनि लावण्य आतां तुझें रूप । वश्य होईल भूप नगरीचा ॥१२७॥ हरलें हें दैन्य आतां तुझें बाई । नाहीं तुज कांहीं भय चिंता ॥१२८॥ ऐकोनियां शब्द तेव्हां तारामती । येती काकुळती विप्रालागीं ॥१२९॥ नका इसी देऊं मज महाराजा । नोहे धर्म माझा ऐसा ताता ॥१३०॥ तथापिही तुम्ही दिलें इचे हातीं । प्राण हा निगुती देईन मी ॥१३१॥ करा उपकार विकावें आणिका । तुम्ही मायबापा कृपावंता ॥१३२॥ वेश्येचें हें द्रव्य दिलें तें माघारें । आला एक विप्र घ्यावयासी ॥१३३॥ दशग्रंथी निपुण षडशास्त्रीं प्रवीण । धर्म परायण महाराज ॥१३४॥ काळ हें कौशिक नाम तयाप्रती । त्यानें तारामती घेतली हे ॥१३५॥ पाकशाळेमाजी करावया अन्न । घेतली अन्नपूर्णा ब्राम्हाणानें ॥१३६॥ धर्माची तूं कन्या माझिये तूं बाई । सुखें आतां राहीं अन्नछत्रीं ॥१३७॥ तारामती करी दोघां नमस्कार । कृपा दिनावर असों द्यावी ॥१३८॥ विलोकिलें तेव्हां नृपाचें वदन । कधीं हे चरण पाहीन आतां ॥१३९॥ मुक्ताफळ झालें समुद्राचे पोटीं । परी झाली तुटी प्राक्तनानें ॥१४०॥ विचित्र हा असे प्रारब्धाचा खेळ । काय तळमळ करूनियां ॥१४१॥ येतें स्वामी आतां कृपा असों द्यावी । सांड न करावी पुन्हा माझी ॥१४२॥ दीपक प्रकाश नोहे हा वेगळा । तैसी मी दयाळा जडलें अंगीं ॥१४३॥ हेंचि जन्मोजन्मीं देगा चक्रपाणी । चालिली तेथूनि तारामती ॥१४४॥ रोहिदास बाळ धांवे तिचे मागें । आवरीत अंगें राजा त्यासी ॥१४५॥ घेऊनियां येतों मातेचें दरुशन । विलोकी वदन तारामती ॥१४६॥ प्रेमपान्हा तेव्हां आला तिचे स्तनीं । पाजी त्यालागुर्नी बैसूनियां ॥१४७॥ पाहुनी सर्वांचें सद्नद अंतर । बोलतां उत्तर नये वाचे ॥१४८॥ नको करूं देवा मायबाळा तुटी । पाहावेना द्दष्टी कोणासी हें ॥१४९॥ काळ कौशिकासी बोले तारामती । ऐकावी विनंति एक ताता ॥१०५॥ घ्यावा रोहिदस करील हा सेवा । तुम्ही कृपार्णवा महाराजा ॥१५१॥ ऐकोनियां ऐसें विप्रासी तो बोले । काय याचें मोल सांगा स्वामी ॥१५२॥ अर्ध तुक हें घेऊं येचि क्षणीं । दिलें त्यालागुनी कौशिकानें ॥१५३॥ तारामती आणि रोहिदास बाळा । घेउनी दयाळ गेला तेव्हां ॥१५४॥ हाटवतीं उभा असे हरिश्चंद्र । आला तो महार वीरबाहू ॥१५५॥ ब्राह्मणासी पुसे काय याचें मोल । हेम दोन मोल घेऊं याचें ॥१५६॥ मानली हे गोष्टी डोंबाचिया चित्ता । घेतला हा आतां हरिश्चंद्र ॥१५७॥ विप्राचे चरणीं नृप ठेवी माथा । कृपा दयावंता असों द्यावी ॥१५८॥ घेउनी हरिश्चंद्र गेला आश्रमासी । सांगतो कांतेसी वीरवाहू ॥१५९॥ सांगा यासी काम आणिला चाकर । पाहुनी उत्तर करी कांता ॥१६०॥ कृश सकुमार आणिला कासया । काय द्रव्य वायां जात होतें ॥१६१॥ सांगती त्या काम डोंबाच्या कामिनी । जाय आणीं पाणी हरिश्चंद्रा ॥१६२॥ त्वरें करूनियां भरीं हे रांजण । दिला उचलुनी कुंभ हातीं ॥१६३॥ जळ आणावया गेला हरिश्चंद्र । मागें विश्वामित्रें काय केलें ॥१६४॥ छिद्र पाडियेलें रांजणाचे तळीं । कुंभ तयेवेळीं फुटिन्नला ॥१६५॥ ताडण करिती डोंबाच्या कामिनी । दिला उचलोनी दुजा कुंभ ॥१६६॥ दोन प्रहर त्यानें वाहिलें उदका । नसे थेंब एक रांजणांत ॥१६७॥ वीरबाहुनें त्या केलेंसे ताडण । दिलें तेव्हां धान्य कोरडें तें ॥१६८॥ दळूं कांडूं लागे करी सर्व धंदा । ध्यानीं त्या गोविंदा आठवीत ॥१६९॥ भागिरथीचे तीरीं करीत स्वयंपाक । आला तेव्हां एक विप्र तेथें ॥१७०॥ घालीं महाराजा मजा आतां अन्न । बैसला येऊन त्याजपाशीं ॥१७१॥ हरोश्चंद्रें त्यासी केला नमस्कार । बैसा क्षणभर स्वामी येथें ॥१७२॥ हरिश्चंद्रें केले दोन भाग अन्न । ब्राह्मणाकारणें दिला एक ॥१७३॥ खाऊनियां अन्न पाहे दुजाकडे । ठेवी तयापुढें हरिश्चंद्र ॥१७४॥ नित्यानित्य तेथें जेवीतसे विप्र । घडे निराहार हरिश्चंद्रा ॥१७५॥ शरीर झालें कृश अंगीं नसे शक्ति । तयासि बोलती वीरबाहू ॥१७६॥ स्मशानीं रक्षण करीं तूं हें आतां । अवश्य म्हणे ताता हरिश्चंद्र ॥१७७॥ म्हणसणखांबा नाम ठेविलें तयासी । राहे दिवसनिशीं स्मशानीं तो ॥१७८॥ द्रव्यावांचोनियां जाळों न देईं प्रेत । अहोरात्र ध्यात देवाजीशी ॥१७९॥ काळकौशिकाचे घरीं तरामती । वाढीतसे पंक्ति ब्राम्हाणींच्या ॥१८०॥ उत्तम स्वादिष्ट पवित्र तें अन्न । जेविती ब्राम्हाण आवडी प्रेमें ॥१८१॥ रोहिदास करी कौशिकाची सेवा । तुळसी पुष्पें दुर्वा आणितसे ॥१८२॥ फुलें तोडितसे रोहिदास बाळ । दंश केला व्याळें त्याजलागीं ॥१८३॥ सांगातीयांस तेव्हां बोले रोहिदास । सांगावा मातेस नमस्कार ॥१८४॥ नाशिवंत देह गेलासे विलया । नको शोक वांयां करूं याचा ॥१८५॥ वारंवार तिच्या संबोखावें मना । तुम्हांसी प्रार्थना हेचि माझी ॥१८६॥ ऐकोनि सांगाती करिती रुदन । सोडियेला प्राण रोहिदासें ॥१८७॥ पाकशाळेमाजी होती त्याची माता । श्रुत केली वार्ता सांगात्यांनीं ॥१८८॥ ऐकोनियां ऐसें चिंतावली मनीं । कांहो चक्रपाणी ऐसें केलें ॥१८९॥ आटोपोनि सर्व तेथील हा धंदा । निघाली हे शोधा बाळकाच्या ॥१९०॥ झालीसे यामिनी कांहीं न दिसे वाट । मोडताती कांटे पायांलागीं ॥१९१॥ नाहीं त्याची शुद्ध चालली धांवतां । लागलें तें प्रेत पायां तिच्या ॥१९२॥ ओळखूनि तिनें पिटिलें कपाळ । आलंगिला बाळ ह्रदयीं तिनें ॥१९३॥ दर्दरुनी तिचे स्तनीं आला पान्हा पाजूं आतां कोणा रोहिदासा ॥१९४॥ सखया रोहिदासा कां बा रुसलासी । टाकूनि गेलासि मजलागीं ॥१९५॥ पाहात मी होतें नित्य तुझें मुख । विसरलें दु:ख भ्रताराचें ॥१९६॥ घडी घडी माझा हरिसी तूं श्रम । फुटकें हें कर्म माझें देवा ॥१९७॥ काय घडले दोष कीं दैवाची मी हीन । हरपलीं रत्नें दोन माझीं ॥१९८॥ कंठूं आतां काळ कवणाचिये बळें । जाहलें हें निर्मूळ वंशाचें कीं ॥१९९॥ आकोशें करून ह्रदय पिटित । आले अकस्मात्‌ विश्वामित्र ॥२००॥ सांगा बाई कैसें झालें वर्तमान । केलें हें श्रवण त्याजलागीं ॥२०१॥ नको करूं बाई शोक कांहीं आतां । ही समजेल वार्ता आतां डोंबा ॥२०२॥ द्रव्याविण तो हा जाळों नेदी प्रेत । नको करूं मात प्रगट ही ॥२०३॥ आणितों साहित्य अग्नि दे झडकरी । आली तेव्हां तिरीं भागिरथीच्या ॥२०४॥ पेटवूनि अग्नि करी ते रुदन । आला तो धांवून म्हाअणखांबा ॥२०५॥ न देतांना द्रव्य जाळिसी तूं प्रेत । मारीतसे हातें तिजलागीं ॥२०६॥ विखरूनि त्यानें दिला तेव्हां अग्नि । घालुनी जीवन विझविला ॥२०७॥ प्रेत घेऊनियां रडे तारामती । प्रारब्धाची गती कैसी देवा ॥२०८॥ सत्त्वाचा सागर राजा हरिश्चंद्र । त्याचा कीं हा पुत्र रोहिदास ॥२०९॥ अंतकाळीं यास ठाव अग्नि नेदी । स्पर्शला येऊन अनामिक ॥२१०॥ काय ऐसें कर्मीं लिहिलें विधीनें । झाल्या तिघां तीन वाटा देवा ॥२११॥ भ्रतार हरिश्चंद्र गेला कोणीकडे । दु:ख कोणापुढें सांगूं आतां ॥२१२॥ ऐकोनी हरिश्चंद्र खोंचला तो मनीं । आला तो धांवुनी तिजपाशीं ॥२१३॥ सांगे वर्तमान बोले गहिंवरून । करी निवेदन तारामती ॥२१४॥ सांगितला त्यासी सकळ वृत्तांत । ह्रदय पिटीत हरिश्चंद्र ॥२१५॥ येरी म्हाणे कोण सांग तूं हें आतां । श्रुत केली वार्ता मुळींहुनी ॥२१६॥ तुम्हां दोघां दिल्हें कौशिकाचे घरीं । दास्यत्व मी करीं डोंबाचें हें ॥२१७॥ म्हासणखांबा नांव ठेविलें हें त्यानें । करितों रक्षण म्हासणामाजी ॥२१८॥ अद्याप सेविलें नाहीं म्यां हें अन्न । शरीर कृश तेणें झालें माझें ॥२१९॥ ऐकोनियां दु:ख पडली विकळ । घेतला तो बाळ हरिश्चंद्र ॥२२०॥ सख्या रोहिदसा कं बा रुसलासी । टाकूनि गेलासी मजलागीं ॥२२१॥ मजपाशीं तुझें गुंतलेंसे मन । म्हाणुनी धांवून आलासी तूं ॥२२२॥ अंतकाळीं केल्या तिघांसही भेटी । दैवाचीं करंटीं आम्ही दोघें ॥२२३॥ कैसें झालें माझें ह्रदय पाषाण । दिलें म्यां लोटून तुजलागीं ॥२२४॥ जळोत हे हात जावो माझा प्राण । व्यर्थ हा वांचून काय आंता ॥२२५॥ आक्रोशें करुनी ह्रदय पिटीत । त्यासी संबोखीत तारामती ॥२२६॥ नका स्वामी शोक करूं कांहीं आतां । होतें जें संचिता झालें माझें ॥२२७॥ धन्यापाशीं आतां आज्ञा घ्या मागून । द्यावयासी अग्नि महाराजा ॥२२८॥ आज्ञा मागावया गेला हरिश्चंद्र । मागें विश्वामित्न काय करी ॥२२९॥ एकली तूं येथें लावीचें हें भय । देउळांत राहें क्षणभरी ॥२३०॥ ऐकोनि देउळीं गेली तारामती । निद्रा तयेप्रती लागलीसे ॥२३१॥ विश्वामित्र तेव्हां आले देउळांत । काढोनियां आर्त बाळकाची ॥२३२॥ रक्त मांस तिच्या लाविलें मुखासी । सांगत लोकां सि लाव आली ॥२३३॥ बाळ भक्षितसे देउळाभीतरीं । देखोनियं दुरी पळालों मी ॥२३४॥ धीट धीट लोक आंत प्रवेशोनि । बांधिली ते क्षणीं तारामती ॥२३५॥ श्रुत केली वार्ता गांवींच्या राजाला । तो म्हणे लावेला जीवें मारा ॥२३६॥ बोलाविला त्यानेम वीरबाहू डोंब । सांगतसे अंगें राजा त्यासी ॥२३७॥ चालविली तेव्हां भागिरथीचे तीरीं । प्राहती नरनारी द्दष्टीं तेव्हां ॥२३८॥ काळकौशिकाचे घरीं हे देखियेली । नाहीं समजली तेव्हां कोणा ॥२३९॥ एकमेकां ऐसें करिती उत्तर । आला तो महार वीरबाहु ॥२४०॥ ,म्हसणखांबा त्यानें बोलाविला त्वरें । छेदीं इचें शिर आज्ञा केली ॥२४१॥ ओळखिली त्यानें तेव्हां तारामती । प्रारब्धाची गति कैसी देवा ॥२४२॥ घालियेलें तिसी भागिरथीचें स्नान । करीं तुं स्मरण देवाजीचें ॥२४३॥ काय इच्छा असेल माग तुझे मनीं । पुरवील चक्रपाणी तुझी आशा ॥२४४॥ स्वर्गीं सुरव्र बैसोनी विमानीं । पाहती नयनीं कवतुक ॥२४५॥ भ्रतार हरिश्चंद्र रोहिदास बाळ । मागता स्नेहाळ विश्वामित्न ॥२४६॥ श्रीगुरु वसिष्ठ कृपेचा सागर । असो त्याचा कर मस्तकीं हा ॥२४७॥ होंचि जन्मोजन्मीं दे गा नारायणा । नाहीं हे वास्ना आणिकांची ॥२४८॥ तारामती ह्मणे एक्या घायें हाणीं । लक्ष हें चरणीं वसिष्ठांच्या ॥२४९॥ उचलितां कर आले नारायण । धरी आलिंगून हरिश्चंद्रा ॥२५०॥ पितांबरधारि सगुण मेघ:शाम । योग्याचा विश्राम तोचि बाप ॥२५१॥ त्यानें कृपाद्दष्ठि विलोकिलें तिघां । पुढें असे उभा रोहिदास ॥२५२॥ विश्वामित्न तेव्हां संतोपले चित्तीं । आलिंगिलें प्रीति तिघांजणां ॥२५३॥ पुष्पवृष्टी केली स्वर्गीं सुरवरांनीं । धन्य त्रिभुवनीं कीर्ति ज्याची ॥२५४॥ श्रीगुरु वसिष्ठ आले तयेवेळां । सवें असे मेळा ऋषींचा तो ॥२५५॥ त्यानें आइलंगिलें तिघां कृपाद्दष्टि । धेनुवत्सा भेटी झाली जैसी ॥२५६॥ तिघांजणीं केला तेव्हां नमस्कार । प्रेम अश्रु नीर वाहे डोळां ॥२५७॥ ह्रदयी धरुनी आलिंगिलीं त्यानें । मायबाळ तान्हें न विसंबे ॥२५८॥ काळ तो कौशिक वीरबाहु डोंब । विमानीं श्रीरंगें बैसविलें ॥२५९॥ कोटी वरुषें तप विश्वामित्रें केलें । तें समग्र अर्पिलें हरिश्चंद्रा ॥२६०॥ समारंभें नेली अयोध्येसी तिघें । बैसविलीं अंगें राज्यास्थानीं ॥२६१॥ साठसह्स्र वरुषें राज्य करा सुखें । दिला हा स्वमुखें आशिर्वाद ॥२६२॥ सत्त्वधीर राजा सत्त्वाच्या ह्या कीर्ति । ऐकतांचि जाती दोष भंगा ॥२६३॥ नामदेव यासी लागली ती गोडी । वर्णितो आवडी गुण त्यांचे ॥२६४॥