भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वकथा संवत्सरनगरीं । सांगितली असे अवधारी

purvakatha sanvatsaranagarin | sangitali ase avadhari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पूर्वकथा संवत्सरनगरीं । सांगितली असे अवधारी । मग शेषाद्रि पर्वतावरी । गरुड शिखरीं उभा असे ॥१॥ धन्य धन्य हा सोपान । धन्य समाधि संपूर्ण । प्रत्यक्ष येऊनि नारायण । अभयदान दिधलेंसे ॥२॥ अनंत वैष्णव प्रेमळ । दिंडी पताका टाळ घोळ । रामकृष्ण नाम सरळ । भक्त सर्वकाळ नाचती ॥३॥ दिव्य उतरलीं विमानें । देव वर्षती सुमनें ॥ इंद्र चंद्र देवगणें । लोटांगण घालती ॥४॥ समाधिसुखाचा आनंद । अंगें करीतसे गोविंद । कथा सांगितली अभेद । श्रोते सन्निध सकळीं ॥५॥ म्हणती धन्य धन्य सोपान । देव पुरुष चतुरानन । संत महंत वैष्णव प्रमाण । रामकृष्ण गाताती ॥६॥ नामा म्हणे देवराव । मनोरथ पूर्ण करोनि सर्व । अपार गुणकीर्ति लाघव । न कळे माव कोणाशीं ॥७॥