भजनी मालिका
← भजनांकडे परत

परियेसी रुक्माई जैसा बैसला पाटीं । दैन्य पैं न सोडी काय करूं

pariyesi rukmai jaisa baisala patin | dainya pain na sodi kay karun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परियेसी रुक्माई जैसा बैसला पाटीं । दैन्य पैं न सोडी काय करूं ॥१॥ सदैवाच्या स्त्रिया अलंकारमंडित । मजवरी नाहीं प्रीत काय करूं ॥२॥ दरिद्रें विश्रांति घातली वो कैसी । सांगो कोणपाशीं माउलिये ॥३॥ एकी दिव्य वस्त्रें नेसल्या परिकरा । मज खंडें जर्जर मिळालेसें ॥४॥ मोडकें खोंपट वारा येतो भराभराट । बहु होती कष्ट कोणा सांगों ॥५॥ कैंची कुसुमसेज कैंचे पटकुळ । फाटकी वाकळ अंथरूणा ॥६॥ कन्या आणि पुत्र जाली उपवरी । अजोनि न धरी घर प्राणनाय ॥७॥ जनलोकांमाजीं केलें येणें हासें । म्हणती लागलें पिसें नामयासी ॥८॥ जन्मीं न देखे उपाय येणें केले अपाये । कोणा सांगो माये सुखदुःख ॥९॥ आमुच्या वडिलां शस्त्र सुई आणि कातरी । हा बाण आणि सुरी वागवितसे ॥१०॥ एकांतें भाकिलें रुदना करि त्याची नारी । वाहियेली सुरी नागनाथीं ॥११॥ लज्जेचा हा गांव सांडियेला येणें । शिकवावें कोणें माउलिये ॥१२॥ संसाराचा येणें सांडिला पसारा । कणव स्त्री बाळा न ये कैसी ॥१३॥ नसतां विठोबा नसतां पंढरी । तरी हा सुखें घरीं नांदतां कीं ॥१४॥ होणार होऊन गेले शिकवूं आतां काई । विनविते राजाई रखुमाईसी ॥१५॥