भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीसी यात्रा मिळाली अपार । नाहीं तो सुंदर पांडुरंग

pandharisi yatra milali apar | nahin to sundar pandurang

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीसी यात्रा मिळाली अपार । नाहीं तो सुंदर पांडुरंग ॥१॥ म्हणती संतजन काय झाला देव । पडलासे संदेह सकळांसी ॥२॥ कांहो उपेक्षिलें कृपाळु अनंता । भेट देईं संतां आपुलिया ॥३॥ अयोध्या नगरासी नेला पंढरीराव । कळला अभिप्राय सकळांसी ॥४॥ असा कोणी भक्त आहे पराक्रमी । रुक्मिणीचा स्वामी आणी येथें ॥५॥ ऐकोनियां मात कोणीच न बोले । म्हणोन उपेक्षिलें पांडूरंगा ॥६॥ बोले भानुदास आणितों मी देव । कैसा पंढरीराव गेला पाहों ॥७॥ भानुदासें केलें सकळिकां नमन । मग आज्ञा घेऊन चालिला तो ॥८॥ अयोध्या नगरासी गेला भानुदास । पंढरीनिवास पाहावया ॥९॥ दुंदुभी वाजती वाजंत्रांची ध्वनि । परी चक्रपाणी द्दष्टी नये ॥१०॥ प्रात:काळीं पूजा केली रामरायें । आणिका न होय दर्शनची ॥११॥ कवाडें अर्गळा कुलुपें असती द्वारा । करूनियां भीतरीं पांडूरंगा ॥१२॥ देखोनि कवतुक बोले भानुदास । भला बसलास देवा येथें ॥१३॥ भाग्यवंत देव झाल सितूं आतां । दुर्बळ अनाथा कोण पुसे ॥१४॥ तेव्हां झाली रात्र पडिला अंधकार । जोडोनियाम कर विनवितसे ॥१५॥ आतां देव तुम्ही चलावें येथूनि । नाहीं तरी आम्ही भले नाहीं ॥१६॥ आम्हांसि टाकूनि येथें बैसलासि । पोटच्या पोरासी कोण पोसी ॥१७॥ आम्हां वांचोनियां नाहीं तुम्हां गति । न करीं फजिती जगामध्यें ॥१८॥ करुणा वचन भाकोनियां येथें । केलासे उपाय भानुदासें ॥१९॥ कुलुपें कवाडा बंधन उघडती । देखिली श्रीमूर्ति भानुदासें ॥२०॥ राउळाभीतरीं गेला भानुदास । साष्टांगीं चरणास नमन केलें ॥२१॥ सद्नदीत कंठ झाल्या दोघां भेटी । आनंद तो पोटीं समायेना ॥२२॥ देवा तुम्हीं कांहो सोडिली पंढरी । लागलीसे गोडी वैभवाची ॥२३॥ म्हणे पांडुरंग बंदीं मी पडिलों । भिमा अंतरलों चंद्रभागा ॥२४॥ नवरत्नाची माळा घालूनियां कंठीं । म्हणे द्यावी भेटी प्रात:काळीं ॥२५॥ देऊळा बाहेरी गेला भानुदास । कुलुपें कवाडास बंधन झालें ॥२६॥ प्रात:काळीं दर्शन भानुदास करी । आठवी श्रीहरि ह्रदयामधीं ॥२७॥ घालूनि आसन बैसला ध्यानस्थ । ठेवोनियां चित्त पांडूरंगा ॥२८॥ प्रात:काळीं पूजा करावया आला । रामराय न देखे माळा रत्नाचि ते ॥२९॥ कोणी नेली माळा झालासे बोभाट । ताडिलें सत्वर पुजार्‍यासी ॥३०॥ चोर पहावयासी सेवक धांवती । माळा दिसे कंठीं भानुदासा ॥३१॥ त्यासी देखूनि ताडिती प्रसिद्ध । म्हणती हाचि पक्का मैंद चोर असे ॥३२॥ चोर धरूनियां रायाराशीं नेला । म्हणती यासी घाला सुळावरी ॥३३॥ शूळ तासोनियां खांदीं जो दिधला । मागें चालविला भानुदास ॥३४॥ भानुदास म्हणे एइकावें वचन । भेटी मी घेईन विठोबाची ॥३५॥ आला भानुदास देवा नमन केलें । शिक्षेसी लाविलें म्हणे आम्हां ॥३६॥ अगा तुझी देवा लोभ असों द्यावा । आठव धरावा ह्रदयामध्यें ॥३७॥ तुजमज वियोग केंवि होय देवा । न सोडूं केशवा चरण तुझे ॥३८॥ सुळ नेवोनियां वेसीबाहेर रोंविला । म्हणती आतां याला वर घाला ॥३९॥ तेव्हां भानुदास आठवी विठ्ठला । म्हणती लवकर घाला सुळावरी ॥४०॥ भक्ताचा कळवळा पांडुरंगा आला । कंठ तो फुगला सद्नदीत ॥४१॥ नेत्रीं अश्रुधारा कांपतो थरथरी । भक्तांचा कैवारी धांविन्नला ॥४२॥ शूळा अकस्मात्‌ पाला तो फुटला । फळें पुष्पें तो झाला घवघवीत ॥४३॥ शूळ वृक्ष झाला सांगती रायाला । विस्मय वाटला सकळिकांसी ॥४४॥ भानुदासा नमन केलें रामरायें । म्हणे हा अन्याय घडिला आम्हां ॥४६॥ पांडुरंग म्हणे कोणी गांजिलें माझ्या भक्ता । सांग भानुदासा काय झालें ॥४७॥ आमचा कैवारी कृपाळु श्रीहरी । असतां साहाकारी कोण गांजी ॥४८॥ आतां तुम्ही देवा बसावें खांदेसी । नेईन मी तुम्हांसी पंढरीसी ॥४९॥ रामराय म्हणे मज उपिक्षिलें । येथोनियां वहिलें तुम्हीं जातां ॥५०॥ आपुलें वचन सत्य केलें देवा । लोभ आम्हावरी असों द्यावा ॥५१॥ घेवोनी खांदेसी देव बैसवीला । पंढरीसी आला भानुदास ॥५२॥ झालीसे दाटणी करती नमस्कार । मोठा संतभार जमला तेथें ॥५३॥ नामदेव म्हणे संतांचे संगतीं । अधमहि होती संतजन ॥५४॥