भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरी सांडोनी जाती वाराणसी । काय सुख त्यांसी आहे तेथें

pandhari sandoni jati varanasi | kay sukh tyansi ahe tethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरी सांडोनी जाती वाराणसी । काय सुख त्यांसी आहे तेथें ॥१॥ तया पंचक्रोसी म्हणती मरावें । मरोनियां व्हावें जीवन्मुक्त ॥२॥ नको गा विठोबा मज धाडूं काशी । सांगेन तुजपाशीं ऐक आतां ॥३॥ मरचीमात्र वेरण स्तंभीं घाली । घालोनियां गाळी पापपुण्य ॥४॥ जावोनियां तेथें प्रहर दोन रात्रीं । सत्य मिथ्या श्रोतीं श्रवण करा ॥५॥ आई आई बाबा म्हणती काय करूं । ऐसें दु:ख थोरू आहे तेथें ॥६॥ इक्षुदंड घाणा जैसा भरी माळी । तैसा तो कवळी काळनाथ ॥७॥ लिंगदेहादिक करिती कंदन । तेथील र्‍यातना नको देवा ॥८॥ न जाय तो जीव एकसरी हरी । रडती नानापरी नानादु:खें ॥९॥ अमरादिक थोर थोर भांबातले । भुलोनियां गेले मुक्तीसाठीं ॥१०॥ ती ही मुक्ति माझी खेळे पंढरीसी । लागतां पायांसी संतांचिया ॥११॥ ऐसिये पंढरी पहाती शिखरीं । आणि भीमातीरीं मोक्ष आला ॥१२॥ सख्या पुंडलिका लागतांचि पाया । मुक्ति म्हणे वांयां गेलें मी कीं ॥१३॥ घर रिघवणी मुक्ति होय दासी । मोक्ष तो पाठीसी धांव घाली ॥१४॥ मोक्ष सुखासाठीं मुक्ति लोळे । बीं नेघे कोणी कदा काळीं ॥१५॥ मोक्ष मुक्ति जिंहीं हाणितल्या पायीं । आमुची ती काय धरिती सोय़ी ॥१६॥ समर्थाचे घरीं भिक्षा नानापरी । मागल्या पदरीं घालिताती ॥१७॥ अंबोल्या सांडोनी कोण मागे भीक । सांराजाचें सुख तुझें ॥१८॥ जनी म्हणे तुज रखुमाईची आण । जरी मज क्षण विसंबसी ॥१९॥