भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुणपणाचा अभिमान सांडिला । निगम लाजविला नारायणा

nirgunapanacha abhiman sandila | nigam lajavila narayana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निर्गुणपणाचा अभिमान सांडिला । निगम लाजविला नारायणा ॥१॥ कपट करोनि भक्तांसि तारिसी । तुझा तूं ठकसी पंढरीराया ॥२॥ ठकुनी पुंडलिकासी न्यावया वैकुंठासी । या बुद्धी आलासी पंढरिये ॥३॥ तंव त्या भक्तराजें धरियेलें चित्तें । परतोनि मागुतें जाऊं नेदी ॥४॥ अठ्ठावीस युगें गेलीं विचारितां । निर्गम सर्वथा नव्हे देवाअ ॥५॥ मग कटावरी कर धरोनियां धीर । उभा निरंतर राहिलासी ॥६॥ सर्व घे प्रेमें तें हिरोनि बांधिलें । विचारें साधिलें कोणें कोणा ॥७॥ द्वारीं द्वारपाळ जालासी अंकित । सांग बुद्धिमंत कोण ऐसा ॥८॥ नाथिलेनि करिसी आपणा गोंविसी । बोल कां ठेविसी नामयातें ॥९॥ गोणाई म्हणे तुझें नकळे विंदान । देईं कृपादान बाळ माझें ॥१०॥