भजनी मालिका
← भजनांकडे परत

निज गुज रुक्माई पुसे पंढरीनाथा । ठेवुनियां माथा चरणावरी

nij guj rukmai puse pandharinatha | thevuniyan matha charanavari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निज गुज रुक्माई पुसे पंढरीनाथा । ठेवुनियां माथा चरणावरी ॥१॥ सर्वांहुनि पढियंते काय स्वामितातें । तें मज निरुतें सांगा स्वामी ॥२॥ हे माझ्या जीवींचि फेडावी आशंका । ब्रह्मांडनायका कृपाळुवा ॥३॥ न रिगे तुमचें चित्त योगियांचे ध्यानीं । वैकुंठभुवनी प्रीति नाहीं ॥४॥ तेथिंचे सुखभोग सकळ विलास । नावडती उदास कवण्या गुणें ॥५॥ सायोज्यता मुक्ति आपुली देऊनी । ज्ञानी ते निर्गुणीं बुडविले ॥६॥ त्याहुनि जिवलग कोण तुमचे सखे । जे त्याचेनि पैं सुखें वेडावलेती ॥७॥ चतुरानना ऐसा स्तवितां चतुरपणें । अठराही पुराणें वेद चारी ॥८॥ परि तेही उबगली म्हणती नेती नेती । शिणलीं वेवादती साहीजणें ॥९॥ ऐकुनि पंढरीनाथ बोले रुक्माईसी । तूं कां वो नेणसी गुज माझें ॥१०॥ कायावाचामनें सर्व निरंतरी । आहे नाम्यावरी लोभ माझा ॥११॥