भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेत्र माझे रोडले आठवे माहेर । कैं भेटेन निरंतर बाईयांनो

netra majhe rodale athave maher | kain bheten nirantar baiyanno

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नेत्र माझे रोडले आठवे माहेर । कैं भेटेन निरंतर बाईयांनो ॥१॥ चतुर्भुज विठ्ठलु कैं देखेने डोळां । भक्तांचा जिव्हाळा जीव माझा ॥२॥ येणें शोकें रे वाळलों शरीरीं । आठवतों हरि मी काय सांगूं ॥३॥ चारी भुजा उचलोनि क्षेम देईल । कैं मज नेईल पंढरपुरा ॥४॥ काम चित्तीं न लगे आतां कांहीं मज । कैं भेटेल राजा पंढरीचा ॥५॥ त्यासि आठवितां ह्रदय वो फुटे । तो कैं मज भेटे बाप माझा ॥६॥ येणें देह न पवती मग काय येउनि करिती । सांगा काकुळती रखुमाईसी ॥७॥ वामांगीं रुक्मिणी कैं देखेन दोन्ही नयनीं । फेडीन पारणीं डोळियांची ॥८॥ जंव जंव आठवती तंव तंव उभड येती । कोणी न सांगती विठ्ठलासी ॥९॥ ऐसें श्रवणीचें सुख कैचें नवो देखे । येथें येऊनि बहुतेकें काय करिती ॥१०॥ गरुडटके अवघे आकाशीं ओळले । येवोनि सांगितलें विष्णुलोकीं ॥११॥ मग जावोनियां तया ठायां पाहें पंढरिराय । लागेन मी पायां तयाचिये ॥१२॥ याचि लागोनियां आलों लवडसवडी । सांडियेली थड मग रोखिलासी ॥१३॥ गरुडावरी आरूढ बाप माझा जाला । मज न्यावया आला बाईयांनों ॥१४॥ येणें हर्षें संतोष कोठेंच न माये । भेटला विठ्ठल माय रुक्मिणीसहित ॥१५॥ नामा जातसे माहेरा एकला पंढरपुरा । हरी दातारा संसारा वेगळा करीं ॥१६॥