भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवमासवारी म्यां वाहिलासि उदरीं । आस केली थोरीं होसी म्हणोनी

navamasavari myan vahilasi udarin | as keli thorin hosi mhanoni

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नवमासवारी म्यां वाहिलासि उदरीं । आस केली थोरीं होसी म्हणोनी ॥१॥ शेखीं त्यां रे नाम्या ऐसें काय केलें । वनीं मोकलिलें निरंजनीं ॥२॥ कांरे नामदेवा जालासी निष्ठुर । न बोलसी उत्तर कांहीं ॥३॥ सज्जन सोजरीं सांडियेली लाज । जालासि निर्लज्ज एकसरा ॥४॥ प्रेमपिसें तुज लाविलें विठ्ठ्लें । रूप दावुनि केलें तद्रूप तुज ॥५॥ यासि सेविलिया कैंची बाप माय । सर्व हाचि होय सर्वांठायीं ॥६॥ ऐसियाचा संग धरियला तुवां । परिणामीं अनुभवा जाणशील ॥७॥ संत सनकादिकां लावियेलें वेधीं । तींहीं संसार उपाधि सांडियेली ॥८॥ विठ्ठल विठ्ठल हेंचि पैं चिंतन । विटेसहित चरण धरियेले ॥९॥ ऐसें शिकवितां नाम्याचें न मोहरे चित्त । पाहतसे तटस्थ तन्मय दृष्टी ॥१०॥ नामा म्हणे माते वायां कां कष्टसी । विठोबा जीवेंसि जडला जाण ॥११॥