भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरसी मेहता होता सावकार । जुनागडीं घर महा भक्त

narasi mehata hota savakar | junagadin ghar maha bhakta

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नरसी मेहता होता सावकार । जुनागडीं घर महा भक्त ॥१॥ वडील तयाचे करिती व्यापार । गजी सावकार द्रव्य धान्यीं ॥२॥ तया कुळीं झाला भक्तराज पाहीं । धन तें सर्वहि धर्म केलें ॥३॥ अकस्मात्‌ नगरींत यात्रेकरी आले । द्वारके चालिले देवकाजा ॥४॥ मार्गीं बहु कष्ट चोरीव आगळी । म्हणोनि मंडळी भयाभीत ॥५॥ समागमें द्रव्य निभावे कैसेनि । यालागीं चिंतनी हुंडियेचे ॥६॥ ग्रामाचे भीतरीं हिंडती घरोघरीं । हुंडी द्यावी बरी द्रव्य घेईं ॥७॥ ऐसें ऐकतां ते लबाड छळक । उत्तर हो देख देते झाले ॥८॥ नरसी मेहता परम भक्त थोर । आहे सावकार हुंडीवाला ॥९॥ तयाचे निकटीं जावे बहू त्वरें । तुम्हासी तो खरे वाटे लावी ॥१०॥ म्हणोनि प्रेमाचे यात्रेकरी साचे । पुसत मेहताचे घरा आले ॥११॥ देखतांचि मेहता समोरा उठोन । येऊनि नमन करिता झाला ॥१२॥ करूनि पूजन धूपदीप सारे । समर्पण बरे उपचार ॥१३॥ मग करि प्रश्न काय काजा बोला । आम्हां योगें भला असे तोचि ॥१४॥ यात्रेकरी म्हणे जाणें द्वारकेसी । म्हणोनि हुंडीसी करणें असे ॥१५॥ तीन शतें साठ रुपये टाकिले । येरु म्हणे भलें देई हुंडी ॥१६॥ तयेकाळीं हुंडी लिहिली द्वारकेसी । नामा म्हणे साची पेठ खरी ॥१७॥