भजनी मालिका
← भजनांकडे परत

नक्र बोले ऐकें ह्रषिकेशी । नाममात्रे तारिलें गजेंद्रासी

nakra bole aiken hrashikeshi | namamatre tarilen gajendrasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नक्र बोले ऐकें ह्रषिकेशी । नाममात्रे तारिलें गजेंद्रासी । काय कृपें झालें मजविशीं । आतां कैसा बा मोकलूनि जासी ॥१॥ कळलें तुझें देवपण आतां । सोदीं ब्रीद आपुलें दीनानाथा ॥ध्रु०॥ दीनानाथ म्हणविसी कशासाठीं । द्वैतभाव त्वां धरियेला पोटीं । कैसें पाप लाविलें माझें पाठीं । तुझें रूप देखिलें आजि द्दष्टि ॥२॥ दिनानाथ बोलती वेद चारी । साधुसंत गाताती नानापरी । सत्य ब्रीद मिरवत चराचरीं । सोडीं ब्रीद आपुलें झडकरी ॥३॥ रज मात्रें तारिली अहिल्या शिळा । नामें करुनि उद्धरिलें अजामेळा । पापी कैसा मी घननीळा । तुझें रूप देखिलें म्यां आजि डोळां ॥४॥ न्याय ब्रीद घेईन तुझें आतां । पापी कैसा मी सांग दीनानाथा । कैसें पाप मारिलें माझ्या माथां । अझूनि लाज कां नये तुझ्या चित्ता ॥५॥ नक्र बोले देवासी हांसू आलें । निंदा नोहे स्तवन माझें केलें । दीनानाथें तात्काळ उद्धरिलें । विष्णुदास नामा कौतुक बोले ॥६॥