भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्ताई म्हणे देवा । तूं विसावा सर्वां जीवां

muktai mhane deva | tun visava sarvan jivan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुक्ताई म्हणे देवा । तूं विसावा सर्वां जीवां । गुण गौरव अनुभवा । आम्ही जाणों तुज ॥१॥ सत्य सत्य जनार्दना । सत्य सत्य नारायणा । सत्य सत्य तूं आमुचें धना । जगज्जीवन जगदाकारा ॥२॥ तुझेवांचेनि त्रिभुवनीं । दुजा न देखों नायकों कानीं । वेदशास्त्रपुराणें । अगाध महिमा तुझा ॥३॥ तूं देवा देवोत्तम । योगियांचा विश्राम । शिवाचा ही आत्माराम । ऐसा नेम वेदाचा ॥४॥ तरी भक्तांलागीं ऐसा । पावसी तूं ह्रषिकेशा । तुजविण नाहीं भरंवसा । आणिकां देवांचा ॥५॥ तूं परत्रीचें तारुं । तुझा आगम निगम विचारु । तुज चिंतलिया संसारु । निरसे हेंचि सत्य ॥६॥ देव म्हणे मुक्ताबाई । चित्त समरसें जैं माझ्या ठायीं । तैं तया जन्मचि नाहीं । हें सत्य जाणावें ॥७॥ नामा म्हणे ऐसी स्तुति । मुक्ताबाई नंव करिती । तंव संत विनविती । महाविष्णूसी ॥८॥