भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग लावूनियां नेत्र निर्धारु पैं केला । ह्र्दयीं आठविला केशीराज

mag lavuniyan netra nirdharu pain kela | hrdayin athavila keshiraj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग लावूनियां नेत्र निर्धारु पैं केला । ह्र्दयीं आठविला केशीराज ॥१॥ तूं इष्ट मित्र बंधु सोयरा जननी जनकु । नेणें मी आणिकु तुजवांचोनी ॥२॥ येई पंढरीराया मजलागीं धांवतु । झणीं पाहासी अंतू कृपाळुवा ॥३॥ तुझिये भेटीची बहु खंती वाटली । आसुवें दाटलीं नेत्रकमळीं ॥४॥ धीर न धरवे जीवा पोकारितो धांवा । ये माझ्या केशवा मायबापा ॥५॥ कायावाचामनेम विनटलों चरणासी । तो मी शरण आणिकांसी जाऊं कोणा ॥६॥ जन्मोनी पोसणा तुझाची म्हणती । मोकलितां अंतीं लाज कोणा ॥७॥ अनाथा कैवारी नामाची आयणी । वर्णिजे पुराणीं कीर्ति तुझी ॥८॥ तें काय लटकी वाणी करशील आजी । अजुनी तुज माझी करुणा न ये ॥९॥ गजेंद्राकारणें ज्या वेगीं धांवणें । केलें तंव स्मरणें कळवळोनी ॥१०॥ द्रौपदीचे आकांतीं येसी सोडविणें । तें मजकारणें विसरलासी ॥११॥ येतां निरविलें ज्ञानदेवाप्रती । दिधला त्याचे हातीं हात माझा ॥१२॥ तो तूं कैसा मजलागीं करशील उदास । धांव कासावीस थोर जालों ॥१३॥ सर्वभावें तू मजलागीं लोभापर । मी तुझा डिंगर आवडता ॥१४॥ नामा म्हणे हांसे जालें पिसुणाचें । न करी मज दीनाचें अव्हेरण ॥१५॥