भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग जाला स्वयंपाक स्नानविधि सारा । सकळां हांकारा जाणविला

mag jala svayampak snanavidhi sara | sakalan hankara janavila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग जाला स्वयंपाक स्नानविधि सारा । सकळां हांकारा जाणविला ॥१॥ आले महाद्वारीम दिधलीं आसनें । पूजा नारायणें आरंभिली ॥२॥ तंव ठकलों म्हणती देव पहा हो कैसें जालें । सर्व सुख नेलें इहीं भक्तीं ॥३॥ रत्नजडित पाट सत्वरी आणिले । वरी द्विज बैसविले पृथक्कारें ॥४॥ प्रक्षाळोनि चरण पुसिले पीतांबरें । मस्तकीं आदरें तीर्थ वंदी ॥५॥ कस्तुरीचे टिळे दिव्य चंदन उटी । घातलिया कंठी तुळशीमाळा ॥६॥ दशांग धूप रत्नाचा दीपक । ओवाळी नायक वैकुंठींचा ॥७॥ दोही बाही पंक्ति मांडिल्या देव्हडी । राही रुक्माई परवडी वाढितसे ॥८॥ चतुर्विध अन्नें आथिलीं बहुगुणें । षड्र्स पक्वान्नें सर्वांठायीं ॥९॥ मग संकल्प सोडिला नामयाचे करें । भक्त जयजयकारें गर्जिन्नले ॥१०॥ भोक्ता नारायण लक्ष्मीचा पती । म्हणोनि प्राणाहुती घेतल्या वेगीं ॥११॥ भर्ता भोक्ता कर्ता करविता आपण । सहज तेथें पूर्ण सकळ काम ॥१२॥ विश्वंभर कृपादृष्टि न्याहाळीत । प्रार्थना करीत ब्राह्मणांची ॥१३॥ देखोनि ते समृद्धि हरिखले द्विज । जाले नवल चोज पहा कैसें ॥१४॥ कोण हा गृहस्थु केव्हडा भाग्यवंतु । नेणए अद्‌भुतु महिमा याचा ॥१५॥ ऐसे जेविले आनंदे धाले परमानंदें । मुखसुद्धि गोविंदें दिधली करीं ॥१६॥ कर्पूरेंसहित समर्पिले विडे । कर जोडोनी पुढें विनवीतसे ॥१७॥ ऐसा भक्तजन कृपाळू दीनाचा दयाळु । आनंदें गोपाळु उभा असे ॥१८॥ तया नामदेवें भुलविलें लोभें । वेडावले उभे चिदानंद ॥१९॥