भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग अष्टदिशा व्यापुनी । तीर्थें राहिली स्थानीं स्थानीं

mag ashtadisha vyapuni | tirthen rahili sthanin sthanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग अष्टदिशा व्यापुनी । तीर्थें राहिली स्थानीं स्थानीं । आळंकापुरीं पाटणी । इंद्रायणीचां तटीं ॥१॥ धन्य धन्य सृष्टीतळीं । आळंकापुरी महितळीं । कीर्तन करितां वैष्णव मेळीं । ते चतुर्भुज नर होती ॥२॥ मग पुंडलिकासी सांगितलें । कृष्णपक्षीं येथें पाहिजे आलें । येरु म्हणे स्वामीनें सांगितलें । ते शिरस वंदीन ॥३॥ देव म्हणे आम्ही तुम्ही । पंढरीहुनि समागमीं । येवों आळंकापुरा ग्रामीं । सकळ तीर्थांसहित ॥४॥ मग व्यास वाल्मिक बोलीविलें । त्यांसही हें तीर्थ सांगितलें । तें तिहीं शिवपीठ ऐसेम म्हणितलें । जुनाट असे केशवा ॥५॥ या शिवतीर्थाचा महिमा । कवणा वर्णवेल पुरुषोत्तमा । पंढरी पांडुरंग महात्मा । भीमातीरही उत्तम ॥६॥ आणिक आइकें वो सर्वोत्तमा । येथें अधिक अष्टतीर्थ ग्रामा । पंचक्रोशीची उपमा । सिद्धि होती तात्काळ ॥७॥ ब्रह्मा विष्णु इंद्र तप । आणि योगेश्वर उमप । पाताळीं शेष समीप । याज खालता आहे ॥८॥ स्कंदासी उपदेश स्थान । लोहोगिरीसी येऊन । पुरुरवा पुण्य क्षेत्रमहिमान । पूर्वीं येथुनि जालें ॥९॥ येथून भीमरथी नदी । भीमाशंकरा घेऊनि गेला नंदी । तेथुनि उगमीं पडली सर्वां आधीं । मग शंकरें तेथें स्नान केलें ॥१०॥ तें भीमा माहात्म्य प्रसिद्ध । तो हा सिद्धेश्वर अगाध । महा योगेश्वरा निजबोध । आळंकापुर पाटणीं ॥११॥ ऐसें व्यास बोले तये क्षणीं । नामा गेला लोटांगणीं । समाधी मूळपीठस्थानीं । आळंकापुरीम ज्ञानदेव ॥१२॥