भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाभाचिया लोभें मज म्हणसी आपुलें । परी नेणसी तापलें चित्त माझें

labhachiya lobhen maj mhanasi apulen | pari nenasi tapalen chitta majhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लाभाचिया लोभें मज म्हणसी आपुलें । परी नेणसी तापलें चित्त माझें ॥१॥ जन्म मरण दुःखें शिणलों यातायाती । ऐसी माझी खंती न विचारिसी ॥२॥ म्हणोनि विठोबाचा जालों शरणागत । तेणें माझें हित ऐसें केलें ॥३॥ पुत्र कलत्र सकळ भजती हितालागीं । दुःखाचे विभागीं नव्हती कोणी ॥४॥ जन्मोनि भजतांज उचित एक चुके । तें होय पारिखे क्षणामाजीं ॥५॥ नाना योनीं हिंडतां आपुलें निज कर्म । मज होय श्रम तें तूं देई ॥६॥ परी माझ्या विठोबाची सेवा सुख गोडी । नाहीं एक घडी न देखों कोठें ॥७॥ जाती कुळ माझें नाहीं विचारिलें । नेणों अंगिकारिलें कवण्या गुणें ॥८॥ तुजविण त्याचें ह्रदय कोवळें । पाळी माझे लळे नानापरी ॥९॥ शिणलिया बोभाय मग मी वाट पाहें । ये वो माझे माये पांडुरंगे ॥१०॥ शब्दा माझ्या कानीं पडतां तत्क्षणीं । येतसे टाकोनि झेंपावता ॥११॥ न सांगतां कांहीं सर्व जाणें जिवींचें । आणिक ऐसें कैंचें लोभापर ॥१२॥ देऊनि अभयदान करें कुरवाळी । करितसे साउली पीतांबरें ॥१३॥ मायबाप सखा जिवलग सोईरा । माझिया संसारा हाचि एक ॥१४॥ नामा म्हणे माझ्या ह्रदयींचा विसावा । गीतीं गातां जीवा गोडा वाटे ॥१५॥