भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुलुप अर्गळा घालोनि कोठडिसी । घातलें धोंडयाशीं बंदीखानीं

kulup argala ghaloni kothadisi | ghatalen dhondayashin bandikhanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कुलुप अर्गळा घालोनि कोठडिसी । घातलें धोंडयाशीं बंदीखानीं ॥१॥ गोणाई दामासेठी नव्हती तेव्हां घरीं । गेली भीमातीरीं स्नानालागीं ॥२॥ नामदेव गेले राउळा त्वरित । सांगतसे मात केशवासी ॥३॥ दामासेठी आले स्नान करूनियां । राजाई त्यां पायां लागुनि बोले ॥४॥ ऐका हो मामाजी पुत्राची हे मात । धोंडयाशीं घरांत कोंडियलें ॥५॥ दामासेठी बोले नामा कोठें गेला । बोलवा तयाला झडकरी ॥६॥ नारा महादा दोघे जाती राऊळासी । बोलाविती नाम्यासी चला घरीं ॥७॥ मुखाकडे पाहे केशवाच्या नामा । घरीं जातां दामा मारिल तो ॥८॥ देव म्हणे नाम्या भिऊं नको मनीं । नाम हें निर्वाणीं तारिल तुज ॥९॥ नामा घरां आला दामासेठीपायीं । नमस्कारूनि त्यांही उभा पुढें ॥१०॥ दामासेठी म्हणे नाम्या काय केलें । धोंडयाशीं कोंडिलें घरामध्यें ॥११॥