भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंसा हातीं विडा पाहे चहूंकडा । पूतन त्या पुढां काय बोले

kansa hatin vida pahe chahunkada | putan tya pudhan kay bole

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कंसा हातीं विडा पाहे चहूंकडा । पूतन त्या पुढां काय बोले ॥१॥ जाईन गोकुळा वधीन त्या बाळा । ऐसी त्या चांडाळा बोलतसे ॥२॥ विष भरूनि स्तन निघाली पूतना । तीतें देखुनी कान्हा दूध मागे ॥३॥ येऊनि द्वारीं थोकली तंव यशोदा देखिली । कृष्णा आली माउली राहें उंगा ॥४॥ तंव अधिकचि आळी करी वनमाळी । येरी म्हणे दे जवळी पाजीन दूध ॥५॥ पूतने वोसंगा दिधलासे कान्हा । घटघट पय पाना करीतसे ॥६॥ शोषियलें विश्व न धायची भूक । नामया स्वामी न राखे प्राण तिचा ॥७॥