भजनी मालिका
← भजनांकडे परत

जननिये जिवलगे येवो पांडुरंगे । शिणलों भेटि दे गे एक वेळां

jananiye jivalage yevo pandurange | shinalon bheti de ge ek velan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जननिये जिवलगे येवो पांडुरंगे । शिणलों भेटि दे गे एक वेळां ॥१॥ त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टीं पाहे । येऊनियां राहे ह्रदयामाजीं ॥२॥ वासनेच्या संगें शिणलें माझें चित्त । विषयाचे आघात पडती वरी ॥३॥ नाहीं तुझी सेवा केली मनोधर्में । संसार संभ्रमें भ्रांत सदा ॥४॥ नाहीं तुझें नाम गाईलें आवडी । वाळली कुर्वंडी त्रिविधतापें ॥५॥ नामा म्हणे आई धांवें लवलाही । बुडतों चिंताडोहीं तारी मज ॥६॥