भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोणाई म्हणे नाम्या राहिलासी उदरीं । तैहुनि मी करीं आस तुझी

gonai mhane namya rahilasi udarin | taihuni mi karin as tujhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोणाई म्हणे नाम्या राहिलासी उदरीं । तैहुनि मी करीं आस तुझी ॥१॥ उपजलासि तैं मज जाला संतोष । आनंद उल्हास वाटे जीवां ॥२॥ गणगोतामाजीं केलें बारे नांव । पंढरीचा देव प्रसन्न केला ॥३॥ रात्रंदिवस लेखी अंघोळीवरी । तूं मज संसारीं होसी म्हणोनि ॥४॥ तंव तुज अवचित्तीं उपजली बुद्धी । भोपळा हा खांदीं आवडता ॥५॥ हातीं टाळ घेऊनी करिसी आळवणी । घागरिया चरणीं बांधोनियां ॥६॥ सांडोनि घर-दार आपुला संसार । नाचतां विचार न धरिसी ॥७॥ नव्हें तें करितां कोण असे वारिता । परी त्वां आपुल्या हिता प्रवर्तावें ॥८॥ मी एक आहें तंव करीन तळमळ । मग तुझा सांभाळ करील कोण ॥९॥ या विठ्ठलावांचुनी तुज नाहीं संसार । हा बोल विर्धार सत्य माझा ॥१०॥ कोण्या गुणें तुवां घेतलें धरणें । गोणाई म्हणे करणें फळा आलें ॥११॥