भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक तत्त्व त्रिभुवनीं । दुसरें न धरी तूं मनीं

ek tattva tribhuvanin | dusaren na dhari tun manin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एक तत्त्व त्रिभुवनीं । दुसरें न धरी तूं मनीं ॥१॥ म्हणे कां नरहरी नारायण । मग तुज गांजील कोण ॥२॥ दोन मनीं जरी तूं धरिसी । तरी वांयां दंडिला जासी ॥३॥ त्रिविध भक्ति चराचरीं । तयामाजिल एक तूम करीं ॥४॥ चहूंवेदीं जें बोलिलें । तें तूं करीं बा उगलें ॥५॥ पंचइंद्रियांचा संग । त्यांचा नको करूं पांग ॥६॥ साहि चक्रीं मन पवन । तेथें नव्हे आत्मनिधान ॥७॥ सप्तस्वरीं करीं कीर्तन । आणिक न लगेरे साधन ॥८॥ अष्टहि गुणीं सात्विक पूजा । भावें भजा गरुडध्वजा ॥९॥ नवहि द्वारें दंडिती । पुनरपि कोठें कैंचि भक्ती ॥१०॥ दाही दिशा अवलेकितां । दिवस गेले मोजितां ॥११॥ अकरा रुद्र जाले जरी । तरी एकचि श्रीहरि ॥१२॥ बारा मास आणि पक्ष । व्यर्थ जाती दे तूं लक्ष ॥१३॥ तेरा गुणांचे तांबूल । समर्पावें पूगीफळ ॥१४॥ चौदा भुवनें ज्याचे पोटीं । त्याचें नाम विचरा कंठीं ॥१५॥ पंधरा दिवसां एकादशी । करा जागर उपवासी ॥१६॥ षोडश उपचारें पूजा । भावें भजा गरुडध्वजा ॥१७॥ सत्रावी जीवनकळा । तिचा घे कां रे सोहळा ॥१८॥ अठरा पुराणें वाणिती । निरंतर कृष्ण कीर्ति ॥१९॥ म्हणे विष्णुदास नामा । शरण जावें पुरुषोत्तमा ॥२०॥