भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेव म्हणे तूं भक्तशिरोमणी । जोडिले जन्मोनि केशवचरण

dnyanadev mhane tun bhaktashiromani | jodile janmoni keshavacharan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानदेव म्हणे तूं भक्तशिरोमणी । जोडिले जन्मोनि केशवचरण ॥१॥ प्रेमसुख गोडी तुजची फावली । वासना मावळली सकळ तुझी ॥२॥ धन्य तुझें जन्म धन्य तुझें कुळ । धन्य तुज राऊळ जवळीं असे ॥३॥ भक्तिप्रेम धन्य साधिलें तुवां सार । केला पैं संसार देशधडी ॥४॥ क्षणएक एकांती बैसोनी सहज । अंतरींचे गुज बोलों कांहीं ॥५॥ जीवन्मुक्त ज्ञानी जरी जालें पावन । तरि देवतीर्थभजन न संडिती ॥६॥ भक्तशिरोमणी धन्य तूं संसारीं । परि एक अवधारी वचन माझें ॥७॥ भूतळींची तीर्थें पहावीं नयनीं । असे आर्त मनीं आहे मज ॥८॥ तुझिये संगतीचें नित्य सुख घ्यावें । सार्थक करावें संसाराचें ॥९॥ ऐसी उत्कंठा बहुत माझे पोटीं । भाग्यें जाली भेटी तुजसी आजी ॥१०॥ ज्ञानदेव म्हणे पुरवी मनोरथ । करावा मुहूर्त प्रयाणासी ॥११॥