भजनी मालिका
← भजनांकडे परत

धूप पंचारती गंधाक्षता वाहती । पूजिला निवृत्ति वैष्णवांनीं

dhup pancharati gandhakshata vahati | pujila nivrutti vaishnavannin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धूप पंचारती गंधाक्षता वाहती । पूजिला निवृत्ति वैष्णवांनीं ॥१॥ प्रेमें आसुवें येती सकळांचिये डोळां । माळ घाली गळां पुंडलिक ॥२॥ निवृत्तिदेवें ग्रंथ केला होता सार । ठेविला समोर विठोबाच्या ॥३॥ अवघ्या जनालागीं केला नमस्कार । उठावले भार वैष्णवांचे ॥४॥ गोविंद गोपाळ आले ते सकळ । प्रेमें होती विकळ निवृत्तिराज ॥५॥ केलीं आचमनें पुष्कर्णीचे तटीं । आले उठाउठी समाधीपाशीं ॥६॥ नामा म्हणे देवा निवृत्तिसारखा योगी । नाहीं आतां जगीं दावावया ॥७॥