भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे नामया । ऐकें येथें चित्त देउनियां

dev mhane namaya | aiken yethen chitta deuniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव म्हणे नामया । ऐकें येथें चित्त देउनियां । एक एक तीर्थ सांगावया । हें तों पुराणीं असे ॥१॥धृ०॥ नकळे देवाची थोरी । कैसें पुढारिले मुरारी । गौप्यगुज श्रीहरी । सांगतसे नामया ॥२॥ पुराण म्हणसी कोण कथा । तरी ऐकें गा तूं सकळार्था । शैवशास्त्र हा ग्रंथ सर्वथा । सिद्धमार्ग असे ॥३॥ जें जें जुनाट क्षेत्रतीर्थ । जें जें ब्रह्मनामें परमार्थ । तो तो सांगितला हेत । चतुरानाननें ॥४॥ ऐसें देवमुखीचें वचन । ऐकतां संतोषले पूर्ण । मग देताति आलिंगन । येकमेकांसी ॥५॥ जयजयकाराचा ध्वनी । विठठनामें गर्जे वाणी । प्रेम ओसंडत नयनीं । स्फुंदन रोमांचित दाटले ॥६॥ स्फुंदत नामा नाचे गाये । परिसा म्हणे वोळली माये । तो ज्ञानासी पान्हा होये । पूर्ण बोधाचा ॥७॥ नामा म्हणे सकळ संतमेळीं । कथा सांगितली रसाळीं । तंव ज्ञानदेवा करतलमळीं । समाधि शेज घातली ॥८॥