भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव आणि नामा उभे भीमातीरा । प्रेमें येरयेरा आळविती

dev ani nama ubhe bhimatira | premen yerayera alaviti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव आणि नामा उभे भीमातीरा । प्रेमें येरयेरा आळविती ॥१॥ देव म्हणे नाम्या ऐकें गुह्य गोष्टी । संसाराची तुटी जेणें होये ॥२॥ श्रीगुरुवांचुनी मुक्ति तुज नाहीं । भवनदी डोहीं नुतरसी ॥३॥ शरण गुरुसी जालिया सप्रेमें । संसाराचा श्रम उतरेल ॥४॥ गुरुवांचुनियां कैंचा मुक्तिठाव । संसारा हा वाव कैसा होय ॥५॥ म्हणूनि नाम्या तुवां गुरुसि जावें शरण । तेणें भवबंधनें मुक्त होती ॥६॥ ऐसें ऐकोनियां नामा थरारिला । मूर्च्छागता जाला भूमीवरी ॥७॥ भूमि लोळे नामा कंठ सद्‌‍गदित । डोळियां स्त्रवत अश्रुजळ ॥८॥ इतुकें देखोनियां द्रवला पुरुषोत्तम । नाम्यासी सप्रेमें उचलिलें ॥९॥ नाम्या तुज काय वाटतसे दुःख । संसाराचें सुख तुज जालें ॥१०॥ नामा म्हणे देवा तुज ऐसा दाता । मज भवव्यथा कवणेपरी ।११॥