भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालली ते यात्रा गेली द्वारकेसी । करूनि स्नानासी नगरामध्यें

chalali te yatra geli dvarakesi | karuni snanasi nagaramadhyen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चालली ते यात्रा गेली द्वारकेसी । करूनि स्नानासी नगरामध्यें ॥१॥ पहावया घर दुकान हुंडीचें । न दिसे हो साचें तत्क्षणीं ॥२॥ सायंकाळ पडला सांपडेना कोठें । प्राणासी संकट देणें आलें ॥३॥ देश दूर झाला नसे खर्ची कांहीं । देहपात पाहीं करीन आतां ॥४॥ करूनि नेमासी प्राण ते द्यायासी । समीप तीर्थासी केलें असे ॥५॥ ऐसा भाव देव पाहूनि त्वरित । आला हूडकीत तीर्थाजवळी ॥६॥ हुंडी कोठें आहे नरसी मेहत्याची । रुपये साठींची तिनशें वरी ॥७॥ रणछोड आहे नाम माझें पाहीं । रुपये ते घेईं देतों तुज ॥८॥ ऐकतां वचन संतोषला मनीं । धरिलें चरणीं प्रेमभावें ॥९॥ धन्य धन्य तूंरे पाहतां मजला । घेऊनि द्रव्याला आलासीरे ॥१०॥ देउनी रुपये दर्शन दाविलें । जगविख्यात केलें मेहत्यासी ॥११॥ करूनि यात्रेसी जुनागडा आला । भावें हो वंदिला मेहता तो ॥१२॥ म्हणे तुजयोगें झालें मज पाहीं । दर्शन तें ठायीं रणछोडा ॥१३॥ ऐकतांच वाणी प्रेम मनीं भरे । धरिले चरण त्वरें तयाचे हो ॥१४॥ नामा ऐसा देव ऋणी भक्तां । पुरवित होता सर्व ठायीं ॥१५॥