भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाप भक्तप्रिय पाहे कृपादृष्टी । करितसे सुखगोष्टी ब्राह्मणांसी

bap bhaktapriy pahe krupadrushti | karitase sukhagoshti brahmanansi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाप भक्तप्रिय पाहे कृपादृष्टी । करितसे सुखगोष्टी ब्राह्मणांसी ॥१॥ सर्वभावें शरण सर्वकाळी मज । ते हे भक्तराज सखे माझे ॥२॥ याचेनि उपकारें दाटलों संपूर्ण । भक्तपराधीन जालों तेणें ॥३॥ निवृत्ति ज्ञानेश्वर आणि हा सोपान । हे मुगुटमणी जाण सत्वमूर्ति ॥४॥ सर्वभूतीं भजती सर्वभावें सर्वथा । केला पैं अपैता त्याचे बुद्धी ॥५॥ हा जनमित्र जिवलग आमचा सोयरा । सांडिला संसारा ओवाळुनी ॥६॥ माझे नामीं दृढ धरोनि विश्वास । अखंड उदास देहभावीं ॥७॥ जिवाहोनी पढियंता हा भक्त सांवता । निर्धार सांगतां नवलाव याचा ॥८॥ ह्रदय विदारोनि आपुलेनि हातें । ठाव दिला मातें लपावया ॥९॥ बारा दिवसांचा हा भक्तवत्सला । माये सांडियेला वेणुनादीं ॥१०॥ म्हणती वो माझा त्या दिवसापासोनि । नेणें मजवांचून आणिक कांहीं ॥११॥ हा विसोबा खेचर आणि नरहरि सोनार । हा गोरा कुंभार अंतर्निष्ठ ॥१२॥ समाधिस्थ सदा निवालें पैं चित्त । सबाह्य देखत मजलागीं ॥१३॥ सुखाचा सुजणा आसंद सुदामा । हा माझा आत्मा आवडता ॥१४॥ घरदार संसार त्यजिला मजकारणें । तोडिलें पैं येणें मायाजाल ॥१५॥ चोखामेळा बंका भक्त परमसखा । विसोबा हा देखा प्राण माझा ॥१६॥ त्यजुनि सर्व संग एकविध भावें । अनुसरले जिवें माझे ठायीं ॥१७॥ ऐसें या भक्तांचे सांगतों उपकार । आहेत बहुत फार कल्पकोडी ॥१८॥ त्या सकळांच्या चरणींचा रजरेणु माझा नामा । भक्तिभाव प्रेमा दिधला त्यासी ॥१९॥