भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत दिवस भरले पैं गोपाळा । अगा ये विठ्ठला कवण न ये

bahut divas bharale pain gopala | aga ye viththala kavan na ye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बहुत दिवस भरले पैं गोपाळा । अगा ये विठ्ठला कवण न ये ॥१॥ नामा माझा वेगीं देई माझ्या हातीं । जाऊं दे परती अनाथनाथा ॥२॥ खाऊं जेऊं तुज असोस पैं देऊं । कीर्ति तुझी गाऊं जगामाजीं ॥३॥ तुज काय जाणें ब्रह्मांडनायका । नव्हेसी मजसारिखा एकदेशी ॥४॥ अनंत ब्रह्मांडें क्षणें घडामोडीसी । कां मज दुर्बळीसी कष्टाविलें ॥५॥ तुज दुजेपणाचा सहज आला वीट । तूं तंव एकट एकालची ॥६॥ ऐसी कीर्ति वेद वर्णिती पुराणें । तें कां लाजिरवाणें करिसी देवा ॥७॥ तूं कृपेचा कोंवळा म्हणति विश्वजन । त्या तुझें निर्वाण कळलें नाहीं ॥८॥ मैंद मुद्रा धरणें गळां तुळसीमाळा । निवटितोसि गळा न कळतां ॥९॥ आतां आपुला भ्रमु राखे तो शहाणा । झणें माझ्या विर्वाणा पहासी देवा ॥१०॥ गोणाई म्हणे माझा नामा देऊनी हातीं । अंगिकारीं कीर्ति पंढरिराया ॥११॥