भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां स्तुति पुरे पुरे सोपान । प्रेमळाचिया निधाना

atan stuti pure pure sopan | premalachiya nidhana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आतां स्तुति पुरे पुरे सोपान । प्रेमळाचिया निधाना । संतुष्ट जालों रे वचना । एक एका तुझिया ॥१॥ तूं अवतार चतुरानन । ऐसें बोलिले जगज्जीवन । तंव स्तवन करितां सोपान । तो मौन्यचि राहिला ॥२॥ सर्वोत्तम म्हणे चतुरा । महा विचाराच्या सारा । पवित्ररूपा परिकरा । सकळ जनासी तूंची ॥३॥ मग पाचारिलीं तीर्थें । जे जे तिर्थरूप सामर्थें । म्हणे उदक द्यावें स्नानातें । सोपानदेवासी ॥४॥ गंगा जान्हवी मंदाकिनी । भोगावती भीमरथी तिन्ही । येती जालिया माध्यान्हीं । पंचारती घेऊनियां ॥५॥ योगी सिद्ध प्रसिद्ध । नाथादि नारायण नवविध । आणि सनकादिक अगाध । नारदा तुंबर पातले ॥६॥ देवीं आदरिलें स्तवन । ऋषीं वेदघोष आरंभिले पूर्ण । सनकादिकीं भाष्य जाण । हा हा हु हु गंधर्व ॥७॥ मंगळ तुरे वाजती । महावैष्णव हरिकथा करिती । नामा म्हणे पुढतो पुढतीं । चरणा लागे सोपान ॥८॥