भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां जावें वेगीं नामया घेऊनि । सांगावीं आवंतणी ब्राह्मणांसी

atan javen vegin namaya gheuni | sangavin avantani brahmanansi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आतां जावें वेगीं नामया घेऊनि । सांगावीं आवंतणी ब्राह्मणांसी ॥१॥ सकळकामपूर्ण असती तुमच्या पायीं । विचारावें कांहीं न लगे देवा ॥२॥ काय काय न लभे तुमचे कृपादृष्टी । सदा सुखवृष्टी हरिच्या दासां ॥३॥ नामयाचा हात धरोनि पंढरीनाथ । निघाले अक्षत द्यावयासी ॥४॥ निवृत्ति ज्ञानेश्वर जनमित्र सोपान । सांवता जाल्हण घेऊनि सरिसे ॥५॥ चोखामेळा बंका काठीकर पुढें । दोन्हीं बाही देव्हडे सनकादिक ॥६॥ नामयाचे पाठीं चाले केशीराज । लागावया रज चरणींचे ॥७॥ आपुल्या दासाचा सिद्धि न्यावा पणु । म्हणोनि यजमानु जाला देव ॥८॥ तेणें मिसें करितसे क्षेत्रप्रदक्षिणा । प्रार्थित ब्राह्मण परम प्रीति ॥९॥ ऐसा अनाथांचा नाथ दीनाचा गोसावी । आवडी नित्य नवी सेवकाची ॥१०॥ तो या नामयाचा सुखाचा शृंगारु । रुक्मादेविव्रु श्रीविठ्ठल ॥११॥