भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही शरणागत परि सर्वस्वें उदार । भक्तीचे सागर सत्वशील

amhi sharanagat pari sarvasven udar | bhaktiche sagar satvashil

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्ही शरणागत परि सर्वस्वें उदार । भक्तीचे सागर सत्वशील ॥१॥ काय वाचा मनें अर्थ संपत्ति धन । दिधलें तुजलागुन पांडुरंगा ॥२॥ आम्हां ऐसें चित्त तुम्हां कैचें देव । हा बडिवा केशवा न बोलावा ॥३॥ सत्वाचा सुभट बळि चक्रवर्तित । पहा केवढी ख्याति केली तेणें ॥४॥ त्रिभुवनीचें बैभव जोडिलें ज्या लागुनि । तें शरीर तुझ्या चरणीं समर्पियेलें ॥५॥ रावणा ऐसा बंधु सांडूनि सधर । ओळंगति परिवारा ब्रह्मादिकां ॥६॥ तें सांडोनि एकसरा आलासे धांवत । जाला शरणागत बिभीषण ॥७॥ हिरण्यकश्यपें तुझ्या वैर संबंधें । पाहे त्या प्रल्हादा गांजियेलें ॥८॥ अजगर कुंजर करितां विषपाना । परि तुझें स्मारण न संडीच ॥९॥ पति पुत्र स्नेह सांडोनि गोपिका । रासक्रीडे देखा भाळलिया ॥१०॥ एकीं तुझें ध्यान करितां त्यजिले प्राण । सांग ऐसें निर्वाण कवणें केलें ॥११॥ ऐसे मागें पुढें जाले असंख्यात । भक्तभागवत सखे माझे ॥१२॥ त्यांचिनि सरता झालासी त्रिभुवनीं । विचारी आपुल्या मनीं पांडुरंगे ॥१३॥ केलें उच्चारणें बोलतां लाजिरवाणें । हांसती पिसुणें संसारींची ॥१४॥ नामा म्हणे केशवा अहो विरोमणी । निकुरा जाला झणीं मायबापा ॥१५॥