भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी ते जेवणीं ब्रह्मरसधणी । पुरविली आयणी निजभक्तांची

aisi te jevanin brahmarasadhani | puravili ayani nijabhaktanchi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसी ते जेवणीं ब्रह्मरसधणी । पुरविली आयणी निजभक्तांची ॥१॥ नाम्याचें उच्छिष्ट स्वीकारिलें देवें । कवतुक अवघें पाहती द्विज ॥२॥ म्हणती आम्हां येणे कैसी केली भाव । बुडविलें सर्व क्रियाकर्म ॥३॥ नेणवे हा कोण दिसे सुलक्षण । नव्हे क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र ॥४॥ चहूंवर्णा वेगली दिसे याची लीला । विस्मृति सकळां पडली कैसी ॥५॥ निर्धारें नाम्याचा होय मायबापु । सोडविलें संकल्पू त्याच्या हातीं ॥६॥ कायावाचाअमनें लोभ याचेवरी । घातलिया शिरीं मंत्राक्षता ॥७॥ एक म्हणती जाले होते ते निर्माण । आतां आपुलें आपण गौप्य करा ॥८॥ लौकिकीं ही मात प्रकट करा झणीं । न बोलावी कोणी कोणापाशीं ॥९॥ एक म्हणती आतां यासीच वाळावें । आपुलें टाळावें लोकनिंद्य ॥१०॥ अज्ञानासे दोष नाहीं प्रत्यवाय । शास्त्रीं हा उपाय सिद्ध असे ॥११॥ आत्मशुद्धिलागीं करा विचारणा । करा मंत्रस्नाना त्रिपदा जप ॥१२॥ म्हणोनि सत्वर चालिले अवघे । प्रार्थुनियां देवें बोलाविलें ॥१३॥ संकोचित मनें दिसती कवण्यागुणें । कोमाईलीं वदनें सकळिकांची ॥१४॥ काय शंका वाटे तुमच्या मनीं स्वामी । ते कृपा करुनि सांगा मज ॥१५॥ मनाचें मवाळ तुम्ही ब्रह्मबीज । गौप्य नये गुज करुं कांहीं ॥१६॥ मी तुम्हां सकळांचें असे कृपापात्र । सांगा जीवीचे आर्त करीन पूर्ण ॥१७॥ मग समर्पोनि दक्षिणासहित तुळशीदळ । वरी त्या पुण्यजळ प्रोक्षूनियां ॥१८॥ चरणावरी नामा घालोनि निरवी । म्हणे कृपा असों द्यावी याजवरी ॥१९॥