भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी स्तुति नमनाची । केलिया भगवंताची

aisi stuti namanachi | keliya bhagavantachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसी स्तुति नमनाची । केलिया भगवंताची । ऐकतां जाली रुची । म्हणे धन्य धन्य रे सख्या ॥१॥ कैसी स्तुति परिकर । जपतां नामावळी साचार । वेगीं तुष्टले हरिहर । निज ब्रह्म स्वरुप ॥२॥ वैष्णव सभोंवते उभे । तिहीं जयजयकार प्रतिभे । करुनि रुक्मिणीवल्लभे । तया प्रसाद दिधला ॥३॥ मागुता ज्ञानदेव वदे । धन्य धन्य तुझीं चरणारविंदें । तेथें रातलिया योगिवृंदें । ते चरण धन्य धन्य ॥४॥ पुंडलिकें स्तवन । मांडावें तंव नारायण । म्हणे सन्मुख उभा सोपान । यासी समाधि देणें लांगेल ॥५॥ निवृत्ती मुक्ताई दोघें । तीं बुझाविलीं पांडुरंगें । उद्धव अक्रुर वेगें । तया संगें निरविलीं ॥६॥ ज्ञानदेवासी उद्धव । बोले एकांतीचा भाव । तुम्हां तुष्टला देवाधिदेव । धन्य धन्य वैष्णव तुम्ही ॥७॥ ज्ञानदेव म्हणे स्वामी । दीनें रंकें विठोबाचे आम्ही । धन्य धन्य भाग्याचे तुम्ही । जे निरंतर विष्णुसंगें ॥८॥ उद्धव म्हणे ज्ञानेश्वरा । आम्ही जाणो कृष्णावतारा । परि पांडुरंग मूर्ति निर्धारा । तूं आणि पुंडलिक जाणसी ॥९॥ नामा म्हणे ज्ञानदेवें मागुतें स्तवन आरंभिलें भावें । तें ऐकवया देवें । एकचित्त केलें ॥१०॥