भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी चिंताक्रांत मनीं दुःख धरिलें । म्हणे कां बापें दिधलें ऐशियासी

aisi chintakrant manin duhkh dharilen | mhane kan bapen didhalen aishiyasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसी चिंताक्रांत मनीं दुःख धरिलें । म्हणे कां बापें दिधलें ऐशियासी ॥१॥ खाया ना जेवाया लेया ना नेसाया । दैन्य भोगावया आलें जन्मा ॥२॥ जयाचि करीं भक्ति त्याचेंचि करणें । घरोघरीं हिंडणें न चुके माझें ॥३॥ लाज सांडुनियां निलाजरा जाला । सूड पडसूड मारिला जोग ज्याणें ॥४॥ देवासुरींज वाहिली तेचि दैना आली । उचितें राहिलीं तैंहूनि ॥५॥ ऐसी भक्तकांता मनीं वाहे चिंता । काय जाला करिता पंढरिराव ॥६॥ वेष वाणियाचा सवें बैल द्वयाचा । म्हणे नामा आमुचा केउतां गेला ॥७॥ बिदीं उभा राहिला घर पुसों लागला । म्हणे नामा राहिला कोणें ठायीं ॥८॥ सांगितलें बिराड तुळसीवन अपार । तेंचि जाणा घर नामयाचें ॥९॥ बाहेर तरी कोणी वैसलासे द्वारीं । बोलविली नारी नामयाची ॥१०॥ अहो घ्यहो बाई हे ठेवावी गोणी । नामा येतो परतोनी येईन मी ॥११॥ येरी म्हणे तुम्ही त्याचें काय जाणा । आपुली नाम खुणा सांगा तुम्ही ॥१२॥ नाम पुसेल तरी केशवशेटी सांगावें । लागेल तितुकें वेचावें हें द्रव्य ॥१३॥ आणिक मज मागावें कांहीं न ठेवावें । माझें क्षेम सांगावें सखा म्हणोनि ॥१४॥ इतुकें बोलुनि देव पाठमोरा जाला । सवेंचि घरा आला विष्णुदास ॥१५॥ म्हणे कैंची गोणी टाकुन गेला वाणी । परि आम्हीं कोणी ओळखूं ना ॥१६॥ त्यानें नांव केशवशेटी म्हणितलें । तंव येरें जाणिलें माझा देव ॥१७॥ कां गे धांवा केला देव माझा कष्टला । अपराध जाला तुजपाशीं ॥१८॥ राजाई म्हणे आम्हां थोर लाभ जाला । बिडवई भेटला केशवशेठी ॥१९॥