भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें कांहीं एक अपूर्व देखिलें । ह्रदयीं कोंदाटलें मूर्तिरूप

aisen kanhin ek apurva dekhilen | hradayin kondatalen murtirup

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें कांहीं एक अपूर्व देखिलें । ह्रदयीं कोंदाटलें मूर्तिरूप ॥१॥ परी तें कांहीं तैसें न राहे निश्चळ । चित्त तें चंचळ मावारलें ॥२॥ पुढती सायास करी नानापरी । न राहे अंतरीं साचोकारें ॥३॥ आवडीनें जीव झाला कासावीस । तंव त्या परेशास कृपा आली ॥४॥ ब्राम्हाणाचें रूप उभा ठेला पुढें । निज भक्तांचें कोडें परवावया ॥५॥ कपोलासी शंख लाविला स्वहातें । तेव्हांचि तयातें ज्ञान झालें ॥६॥ वैकुंठ पिठीचें अधिष्ठान साचें । तें रूप तयाचे द्दष्टी पडे ॥७॥ नामा ह्मणे काय सांगावा नवलावो । भक्तांलागीं देवो साहकारी ॥८॥