भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें बोलोनियां हरी । रुक्मिणीसीं विचार करी

aisen boloniyan hari | rukminisin vichar kari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें बोलोनियां हरी । रुक्मिणीसीं विचार करी । यासी भोजनें परोपरी । अन्नें निफजवावीं ॥१॥ संतोष जाला हरिभक्तां । जेथेम स्वयें हरी भोक्ता । कर्ता आणि करविता । सर्व चाळक विठठल ॥२॥ तंव दिव्यग्राम उभवुनि । भक्तीं देखिले नयनीं । विश्वकर्मा येऊनी । उत्तरापंथें निर्मिले ॥३॥ तंव अष्टमहासिद्धी । सर्व सामोग्रीसी समृद्धि । कर जोडोनी कृपानिधी । विनविती आनंदें ॥४॥ दिव्यवनें दिव्यवल्ली । दिव्यसुमनें समग्र जालीं । वैकुंठीहुनि आलीं । महाविष्णुकारणें ॥५॥ तेथें सुगंध परिमळ । जवादि कस्तुरी निर्मळ । चिंतामणी देती ढाळ । नानाकीळ दीप्तीचे ॥६॥ चंदनाचे खांब उभारिले । पवळ वेलीचे शोभले । मुक्ताफळाचे घोस मिरवले । रत्नखचित दामोदरें ॥७॥ चंपक सुमनाचियां हारी । सेवंती वाटोगर नानापरी । नानापुष्पें परिमळ आगरीं । दिव्यवनें कीं शोभती ॥८॥ आंबे खजुरिया पोफळी । फणसें नारिंगें नारिकेळीं । कर्दळी वाडिन्नलीया सरळी । उदक पाट वाहताती ॥९॥ तेथें भ्रमर रुणुझुणु करित । कोकिळा सुश्वरें बोलत । पारवे आनंदें घुमघुमित । सुखें संवादती निजगजरें ॥१०॥ ताललोरी गीती गाती । गोपाळ वीणे वाजवती । नाना परी बागडे धरिती । देव पाहती विमानीं ॥११॥ थकलीं योगियांचीं ध्यानें । निश्चळ राहिलीं आसनें । निवृत्ती सोपानें । तेथें देवडे उभे असती ॥१२॥ नामा जातो लोटांगणीं । वैकुंठ उतरलें मेदिनी । आळंकापुर पाटणीं । उत्तरापंथें देखिलें ॥१३॥ जेथें त्रिभुवनिचें निधान । स्वयं आपण भगवान । तेथेम सकळ काम होती पूर्ण । जाणती खुण अंतरंग भक्त ॥१४॥ नामा म्हणे ऐसीं विंदानें । भक्तीलागीं जगजीवनें । प्रत्यक्ष वैकुंठ भुवनें । दासा सुखसंपन्न करावया ॥१५॥