भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा नित्यानित्य चालतां सुपंथीं । पदोपदीं कीर्ति नामघोष

aisa nityanitya chalatan supanthin | padopadin kirti namaghosh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसा नित्यानित्य चालतां सुपंथीं । पदोपदीं कीर्ति नामघोष ॥१॥ आला आळंकापुरीं इंद्रायणी-तीरीं । स्नानसंध्या करी देवपूजा ॥२॥ देखोनी सुब्राह्मण केलेंसे नमन । वंदिले चरण सिदोपंतीं ॥३॥ कोण तुमचा गांव आलेति कोठुन । काय अभिधान गमन कोठें ॥४॥ विठठलाचें नाम रामेश्वरी भाव । वृत्ति आपेगांव गोदातीरीं ॥५॥ मातापिता वृद्ध वसताती तेथें । द्वारकादि तीर्थें करुनी आलों ॥६॥ आजि धन्य भाग्य स्वामीचें आगमन । आश्रम पावन कीजे माझा ॥७॥ आणुनी मंदिरीं सारुनी भोजन । निद्रा करविली पूर्ण तया हातीं ॥८॥ तंव स्वप्न अवस्थेमाजी येउनि पंढरेनाथ । म्हणे कन्या सालंकृत द्यावी यासी ॥९॥ प्रातःकाळ जाला नित्यनेमु सारिला । मग नमस्कार केला सिदोंपतीं ॥१०॥ वंदोनियां चरण सांगितलें स्वप्न । कन्यापाणिग्रहण कीजे तुम्ही ॥११॥ हांसोनी उत्तर बोले पैं सारांशें । आज्ञा श्रीनिवासें केली नाहीं ॥१२॥ आजिचा सुदिन स्वस्थ करुनी मन । वंदिले चरण सिदोपंतीं ॥१३॥ ऐसे सुसंकल्प हेलावती मनीं । तुळसीवृंदावनीं निद्रा केली ॥१४॥ मग विश्वीं विश्वंभर व्यापुनियां स्थानीं । येऊनियां स्वप्नीं काय बोले ॥१५॥ भक्ति आणि ज्ञान वैराग्य आवडी । हे वसती उघडी तुझ्या अंगीं ॥१६॥ मूर्तिमंत चारी जन्मती इच्या उदरीं । म्हणोनि स्वीकारी आज्ञा माझी ॥१७॥ उठोनि विठठलें स्वप्न सांगितलें । हरुषें वंदिले सिदोपंतीं ॥१८॥ पाचारोनी जोशी घटितार्थ पाहिले । गुण उतरले छत्तीसही ॥१९॥ निर्धारिलें लग्न मिळाले ब्राह्मण । निर्विघ्न पूजन केलें आधीं ॥२०॥ देवकप्रतिष्ठा ब्राह्मणपूजन । घटिका जाली पूर्ण म्हणती द्विज ॥२१॥ कुळदेवस्मरण म्हणती सावधान । उभयतांचें मन पांडुरंगीं ॥२२॥ जालें पाणिग्रहण विधीसी अर्पण । वंदिले चरण सिदोपंतीं ॥२३॥ पांडुरंगक्षेत्रा मिळालीसे यात्रा । आले पंढरपुरा भक्तराज ॥२४॥ गरुडटके पताका मृदंग वाजती । वैष्णव गर्जती जयजयकारें ॥२५॥ गरुडपारीं उभे दाटी वैष्णवांची । उपमा वैकुंठीची पंढरीये ॥२६॥ राऊळभीतरीं प्रवेशलीं दोघें । देखियेले उभे पांडुरंग ॥२७॥ कायावाचामनीं पारुषले नयनीं । मस्तक चरणीं ठेवियेला ॥२८॥ विठठलासी ध्यान रामकृष्णमाळा । ह्रदयीं जिव्हाळा श्रीमूर्ति राया ॥२९॥